कोणत्याही फेसबुकवर ‘कन्फेशन’च्या नावाखाली जुन्या चुकांची कबुली देताना जुन्या वर्गमैत्रिणी आणि शिक्षकांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात थेट नावानिशी बदनामी केली जात असून यात सहपाठी विद्यार्थिनी आणि नावडत्या शिक्षकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याने सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग आता जाणवू लागला आहे.
शाळा, महाविद्यालयात घडलेल्या चुकांचा पश्चाताप होऊन त्याची कबुली देण्यासाठी फेसबुकवर ‘कन्फेशन ट्रेण्ड’ सुरू झाला आहे. पहिल्या काही महिन्यात यातील विकृतीचे गांभीर्य फारसे जाणवत नव्हते. परंतु, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने कन्फेशन पेजेस पोस्ट केले जात आहेत, त्यातील मजकूर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत, विद्यार्थिनी आणि शिक्षकांच्या नावानिशी लिहिला जात असल्याने त्यांना शिक्षण क्षेत्रात बदनामी होण्याची दहशत वाटू लागली आहे. असे पेजेस रोजच लिहिले जात असून यात आपले नाव तर नाही ना, या भीतीपोटी अनेक विद्यार्थिनींनी फेसबुक अकाऊंट बंद केले आहे.   
कन्फेशन करणाऱ्यांमध्ये आजी-माजी महाविद्यालयीन तरुणांचा सर्वाधिक भरणा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये, कोचिंग क्लासेसमध्ये असताना हातून झालेल्या चुका, सहपाठी विद्यार्थिनीवर केलेले प्रेम, तिच्याकडून न मिळालेला प्रतिसाद, न आवडणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांबद्दलच्या आक्षेपार्ह कॉमेंट्स अशा मजकुराने कन्फेशन पेजेस रंगू लागले असून बदनामी मात्र विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षिकांच्या वाटय़ाला येत आहे. यात ‘गॉसिप’ खुलेआम उलगडले जात असून कन्फेशन लिहिणारे जुन्या सहकाऱ्यांचा विश्वासघात करीत आहेत.
जुन्या वर्गमैत्रिणींची नावे सर्रास घेऊन तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देणे, शिक्षिकेचे नाव घेऊन तिच्याबद्दल अश्लील भाषेत मजकूर लिहिणे, शिक्षकाविषयी बदनामीकारक भाषा वापरणे, यामुळे ‘कन्फेशन पेज’ म्हणजे बदनामीचे अत्याधुनिक साधन झाले आहे. फेसबुक तरुणाईत अत्यंत लोकप्रिय इंटरनेट माध्यम असून त्याचा असा दुरुपयोग शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरू लागला आहे.