साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांचे समर्थक रात्री एकच्या सुमारास भिडले. उदयनराजे यांनी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवेंद्रराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आणेवाडी येथील टोलनाक्यावरून हा जबरदस्त राडा झाल्याचीही माहिती समोर येते आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले, दोघांची निवासस्थाने असलेल्या परिसरात कारच्या काचाही फोडण्यात आल्या.

आणेवाडीचा टोलनाका मागील १२ वर्षांपासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. मात्र रिलायन्स कंपनीने हा टोलनाका त्यांच्याकडून काढून घेतला. त्यानंतर रिलायन्स कंपनीने हा टोलनाका शिवेंद्रराजेंच्या समर्थकांना दिला. बाळासाहेब खंदारे यांच्या ताब्यात हा टोलनाका सध्या आहे. खंदारे हे आमदार शिवेंद्रराजेंचे समर्थक आहेत. या निर्णयामुळे उदयनराजेंचा चांगलाच संताप झाला.तसेच रात्री झालेला वाद या टोलनाक्यावरूनच निर्माण झाला, ज्याचे रूपांतर राड्यामध्ये झाले. टोलनाक्यावर काम करणाऱ्या कामगारांचे काय होणार? हा प्रश्न पुढे करत उदयनराजे भोसले गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. शिवेंद्रसिंह आणेवाडी टोलनाक्यावर जाणार होते, मात्र ते गेलेच नाहीत.

आमदार शिवेंद्रराजेंचे काही कार्यकर्ते या टोलनाक्यावरून जात होते. त्यापैकी काही जणांची उदयनराजेंच्या समर्थकांसोबत बाचाबाची झाली ज्यानंतर त्याचे रूपांतर राड्यात झाले. उदयनराजे भोसले यांनी त्या कार्यकर्त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही होतेच.  शिवेंद्रराजे यांच्या सुरुची बंगल्यापर्यंत हा पाठलाग करण्यात आला, ज्यानंतर राडा आणि दगडफेक सुरु झाली आणि वाद आणखी चिघळला असेही समजते आहे. तसेच यावेळी गोळीबार झाल्याचीही माहिती समोर येते आहे.

हा सगळा प्रकार पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवले. आता सुरुची बंगला आणि उदयनराजे वास्तव्य करतात त्या जलमंदिर पॅलेस भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  शाहुपुरी येथील पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पहाटे तीनपर्यंत सुरु होती.