यवतमाळामध्ये मुलाला उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरलेले प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आता सुडबुद्धीने वागत असून, निलंबनाची कारवाई हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप महापौर संगीता अमृतकर यांनी केला आहे. ‘काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत लबाडांची संख्या जास्त आहे,’ असा टोला अमृतकर यांनी लगावल्याने पक्षांतर्गत वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
राज्याचे पर्यावरण मंत्री व येथील लोकसभेचे उमेदवार संजय देवतळे यांच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावरून प्रदेश काँग्रेसने महापौर संगीता अमृतकर यांच्यासह एकूण ८ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या निलंबनाच्या विरोधात महापौर व पदाधिकाऱ्यांनी आता एल्गार पुकारला असून, थेट ठाकरे यांनाच लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. मतमोजणीच्या आधीच काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. ठाकरे यांनी ही कारवाई करताना पक्षाची घटना केराच्या टोपलीत टाकली, असा आरोप महापौरांनी केला आहे.
काँग्रेसच्या घटनेत कारणे दाखवा नोटीस दिल्याशिवाय कुणावरही कारवाई करू नये, असे नमूद असताना ही प्रक्रिया ठाकरे यांनी राबवली नाही, असे अमृतकर यांनी म्हटले आहे. माणिकराव ठाकरे आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. पक्षश्रेष्ठींनी त्यांना दाद दिली नाही. तेव्हापासून ते सुडबुद्धीने वागू लागले असून, यातून आलेल्या वैफल्याचा राग इतरांवर काढू लागले आहेत. निलंबनाची कारवाई त्याचाच एक भाग आहे. २००९ च्या निवडणुकीत याच देवतळेंनी पक्षाच्या विरोधात काम केले होते. त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून मोकळे सोडण्यात आले. यावेळी मात्र थेट निलंबनापर्यंत मजल गेली. राज्यातील प्रदेश काँग्रेस केवळ आमदारांचे हित जोपासणारी संघटना झाली आहे, असा आरोप अमृतकर यांनी केला आहे.
 केवळ आमदारांनाच खुश करायचे असेल तर कार्यकर्त्यांची पक्षाला गरज काय? असा सवाल अमृतकर यांनी उपस्थित केला आहे. प्रदेश काँग्रेसने आधी आमच्या विरोधातील तक्रारीची शहानिशा करावी, त्यानंतर नोटीस बजावावी आणि मग कारवाई करावी, असे आवाहन अमृतकर यांनी प्रदेशाध्यक्षांना केले आहे. या घडामोडींमुळे या वेळी राज्यात काँग्रेस एकदिलाने निवडणूक लढली या नेत्यांच्या दाव्यातील फोलपणा समोर आला असून, निकालाच्या आधीच पक्षातील वाद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.