हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : जिल्हा परिषदेत महाआघाडीची सत्ता स्थापन करण्यात आलेले अपयश आणि आता पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची लागलेली वर्णी यामुळे रायगड जिल्ह्य़ात महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस प्रकर्षांने समोर आली आहे.

राज्यात महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर रायगडमध्ये हेच सूत्र राबविण्याचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने घेतला होता. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये तसे प्रयोग करण्यात आले. रायगड जिल्ह्य़ात मात्र महाआघाडीत बिघाडी कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर रायगड जिल्हा जिल्हा परिषदेत महाआघाडी व्हावी यासाठी शिवसेना आग्रही होती. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात खासदार सुनील तटकरे यांच्याशी शिवसेना नेत्यांनी बोलणीही केली होती. मात्र निवडणूकपूर्व आघाडी असल्याचे कारण देऊन शेकापची साथ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यामुळे महाआघाडीचे समीकरण आकारास येऊ शकले नाही.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला स्थान दिले नाही. सभापती पदाच्या वाटपावेळी बघू, असे म्हणत शिवसेनेची बोळवण करण्यात आली. जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या १८ जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून निवडणूक लढवली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाआघाडी तूर्तास होणार नाही हे स्पष्ट झाले. शेकापच्या योगिता पारधी यांची अध्यक्षपदी आणि राष्ट्रवादीच्या सुभाष घारे यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध वर्णी लागली. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली; पण इथेही शिवसेनेच्या हाती फारसे काही पडत नाही स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यातून जिल्हा परिषदेत महाआघाडीचे दरवाजे आपोआप बंद झाले.

मंत्रिमंडळ विस्तारात सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. उलट राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. पालकमंत्री पद तरी शिवसेनेकडे राहावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात आली. सुभाष देसाई अथवा अनिल परब यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद सोपविले जाईल, अशी अपेक्षा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना होती; पण त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या.

संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोहा येथे तातडीने कार्यकारिणीची बैठक घेतली. मंत्रिपदाबाबत पक्षाची अडचण समजून घेऊ, पण पालकमंत्री पदाबाबत तडजोड करणार नाही. पालकमंत्री शिवसेनेचाच हवा, अशी आग्रही भूमिका सर्वानी मांडली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पालकमंत्री बदलण्याची मागणी करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

मंत्रिपद देताना अडचणी होत्या हे आम्ही समजू शकतो; पण पालकमंत्री पदाबाबत तडजोड करण्याचा प्रश्नच नाही. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या जिल्ह्य़ात त्या पक्षाचा पालकमंत्री असावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती. त्यानुसार रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्यायला हवा. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री बदला म्हणून विनंती करणार आहोत.

– भरत गोगावले, आमदार शिवसेना

पालकमंत्री पद कोणाला द्यावे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडणे काही गैर नाही. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे; पण पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे या महाआघाडीतील सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन काम करतील याची मी ग्वाही देतो.

– सुनील तटकरे, खासदार तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस