News Flash

अंदाजपत्रकातच सावळा गोंधळ

अंदाजपत्रकावरील चर्चेला गुरुवारी टोकाचेच वळण लागले. सर्वच आघाडय़ांवर अनभिज्ञ असलेल्या प्रशासनाने केवळ मागचे पाहून आकडेवारीत कमीअधिक वाढ करून अंदाजपत्रक तयार केल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.

| May 22, 2014 02:52 am

अंदाजपत्रकावरील चर्चेला गुरुवारी टोकाचेच वळण लागले. सर्वच आघाडय़ांवर अनभिज्ञ असलेल्या प्रशासनाने केवळ मागचे पाहून आकडेवारीत कमीअधिक वाढ करून अंदाजपत्रक तयार केल्याचेच आता स्पष्ट झाले आहे. शिवाय यातील करआकारणीही बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळेच संतापलेले स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी अखेर नागरिकांनी करभरणाच करू नये असे आवाहन करीत स्थायी समितीची ही सभा गुरुवारी तहकूब केली. दरम्यान अंदाजपत्रकासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच मनपाचे मुख्य लेखाधिकारीच अचानक आजारपणाच्या दीर्घ रजेवर निघून गेल्याने गोंधळात भरच पडली आहे.
अंदाजपत्रकावरील चर्चेच्या तिस-या दिवशी मनपा आयुक्त विजय कुलकर्णी व मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार अनुपस्थित होते. कुलकर्णी मनपाच्या कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले, शेलार मात्र गुरुवारपासून दहा दिवसांच्या आजारपणाच्या रजेवर गेले आहेत. त्यालाच आजच्या सत्रात सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. मनपाच्या स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना मुख्य लेखाधिकारी रजेवर कसा जातो, असा सवाल करीत सदस्य दीप चव्हाण यांनी त्यावर संतप्त भावना व्यक्त केल्या. डागवाले यांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर वादंग होऊन या मुद्दय़ावर सभाच तहकूब करण्यात आली. उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी शेलार यांच्या जागी प्रभारी म्हणून सहायक उपायुक्त संजीव परसरामी यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट करून ही सभा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावरही वादळी चर्चा झाली. लेखाधिका-याच्या अनुपस्थितीत होणारी सभाच बेकायदेशीर असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते, मात्र ते मागे घेऊन सभा सुरू करण्यात आली.
तहकुबीनंतर पुन्हा सुरू झालेल्या सभेतही सदस्य व प्रशासनात सातत्याने खडाजंगीच झाली. चव्हाण यांनी करवसुलीतील वृक्ष कराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून हा कर कशाच्या आधारावर वसूल करता, याची विचारणा केली. प्रशासनाला त्यावर ठोस स्पष्टीकरण देता येत नव्हतेच, मात्र नगरपालिका असताना सन १९९७ मध्ये झालेल्या ठरावानुसार हा कर वसूल केला जातो असा खुलासा सभेत करण्यात आला. त्यावर हे कर-दर मंजूर आहेत काय, अशी विचारणा सदस्यांनी केली असता सारेच गोंधळून गेले. अखेर सध्याचे कर-दर मंजूर नाहीत हे प्रशासनाला मान्य करावे लागले. त्यामुळे जर कर आकारणीच बेकायदेशीर असेल तर त्याची बिले नागरिकांना पाठवून ही वसुली कशी वसूल करता, असा सवाल चव्हाण यांनी केला. डागवाले यांनीही करवसुलीची बिलेच बेकादेशीर असल्याचे स्पष्ट करून त्यात दुरुस्ती करून दर-कराची पुनर्रचना करण्याची सूचना केली. त्यानंतरच नागरिकांना बिले पाठवून त्यानुसार वसुली करावी असे त्यांनी सांगितले. ते प्रशासनाला मान्य नव्हते. तसे झाले तर अंदाजपत्रकच बदलावे लागेल, असे त्यांनी सांगितले, मात्र त्यावरच उपायुक्त (कर) बेहेरे व चव्हाण यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. अखेर डागवाले यांनीच त्यात हस्तक्षेप करून करवसुलीची बिलेच बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा देत ती दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी ही बिले भरू नयेत असे आवाहन केल्याने सभेत एकच खळबळ उडाली. अखेर या मुद्यावरच सभा तहकूब करण्यात आली. आता ती उद्या (शनिवार) होणार आहे.
 खातेप्रमुखांची कानउघडणी
अंदाजपत्रकावरील तपशीलवार चर्चेने यंदा मनपाच्या प्रशासनाचा सावळा गोंधळच चव्हाटय़ावर आला.
गुरुवारी या चर्चेला आयुक्त कुलकर्णी उपस्थित नव्हते, मात्र दुपारी बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांनी सर्वच खातेप्रमुखांची बैठक बोलावून चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 2:52 am

Web Title: confusion in mnc budget 3
Next Stories
1 आश्वासनानंतर नगरकर यांचे उपोषण मागे
2 गारपीट अनुदानापोटी २० कोटींचे वाटप
3 रूग्णालयांच्या अनधिकृत बांधकामांवर खडाजंगी