सोलापूर : सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूजजवळ माळशिरस येथे असलेले ऐतिहासिक स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई आणि जावई महादजी बजाजी नाईक-निंबाळकर यांच्या जोड समाध्यांचे आहे, असा दावा काही इतिहास संशोधकांनी केला आहे. तर याउलट, अन्य इतिहास लेखकांनी हे स्मारक मराठे सरदार वाघमोडे घराण्यातील वीरपुरुषांची असल्याचा प्रतिदावा केला आहे. त्यामुळे हे जोडसमाध्यांचे स्मारक नेमके कोणाचे, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

मराठय़ांच्या रोमहर्षक आणि देदीप्यमान पराक्रमाच्या काळात सोलापूर जिल्ह्य़ाचे योगदान महत्त्वाचे आणि तेवढेच दुर्लक्षित आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सोलापूर जिल्ह्य़ाचा इतिहास-मराठा कालखंड’या संशोधनपर ग्रंथात माळशिरस येथील जोडसमाध्यांचे स्मारक शिवछत्रपतींच्या कन्या सखुबाई आणि जावई महादजी नाईक-निंबाळकर यांच्या समाध्यांचे आहे, असा दावा केला आहे. शिवछत्रपतींच्या आठ राण्यांपैकी सईबाई राणीसाहेबांना सकवार ऊर्फ सखुबाई यांच्यासह राणूबाई आणि अंबिकाबाई अशा तीन कन्या झाल्या. सन १६५७ च्या सुमारास सखुबाई यांचा विवाह फलटणचे बजाजी नाईक-निबाळकर यांचा मुलगा महादजी नाईक-निंबाळकर याजबरोबर पुण्यात झाला होता. महादजींचे वडील बजाजी नाईक-निंबाळकर हे विजापूरच्या सुलतानाच्या पदरी होते. त्यांना सुलतानाच्या आदेशावरून इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला होता. ते शिवछत्रपतींचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची इच्छा जिजाबाईसाहेबांची होती. त्याप्रमाणे बजाजी यांना प्रायश्चित देऊन शुद्ध करण्यात आले. त्याबद्दल कोणीही संशय बाळगू नये म्हणून शिवछत्रपतींनी आपल्या कन्या सखुबाई हिचा विवाह बजाजींचा मुलगा महादजी याजबरोबर लावून देत बजाजीशी व्याह्य़ाचे नाते जोडले होते. पुढे बजाजी व त्यांचे पुत्र महादजी हे मोगली मनसबदार झाल्यानंतर महादजींना मोगलांकडून चार हजारी मनसबदारी मिळाली होती. मोगलांना आदिलशाहीजिंकायची होती. तेव्हा अकलूजचा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. तो जिंकण्यासाठी सन १६७९ च्या सुमारास बजाजी व महादजी निंबाळकरांनी वेढा घातला असता त्या वेळी झालेल्या युद्धात मोगलांना म्हणजेच बजाजींना माघार घ्यावी लागली. मात्र त्या वेळी महादजी यांना वीरमरण आले. शिवरायांच्या मृत्युपूर्वी सहा-सात महिने अगोदर त्यांचे ज्येष्ठ जावई महादजी अकलूजमध्ये युद्धात मारले गेले. त्यांची माळशिरस येथे समाधी आहे. त्यांच्या पत्नी आणि शिवछत्रपतींच्या कन्या सखुबाई यांचीही समाधी तेथेच आहे. उभयतांचे हे जोड स्मारक आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

या स्मारकाच्या निर्मितीवर एकावर इस्लामी बांधकामशैलीचे बांधकाम आहे, तर दुसऱ्या स्मारकावर हिंदू बांधकामशैली दिसून येते. घुमटाकार छतावर चारही बाजूस चार मिनार आहेत. स्मारकाजवळ सरदारी पेहरावातील एक पुरुष शिल्प दगडी शिळेवर कोरलेले आहे. दुसऱ्या बाजूला दुसरे दगडी शिल्प असून त्यावर स्त्रीचे रूप दोन्ही हात जोडलेले आहे. हे शिल्प सखुबाईंचे आहे, असा तर्क इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी काढला आहे. सध्या हे स्मारक उपेक्षित आहे.

तथापि, ही जोडसमाधी महादजी निंबाळकर व सखुबाई यांची आहे, या मताशी इतिहास अभ्यासक सुमित लोखंडे व संतोष पिंगळे यांनी असहमती दर्शविली असून ही जोडसमाधी माळशिरस भागातील मराठे सरदारांपैकी वाघमोडे घराण्यातील वीरपुरुषांची असावी, असा दावा केला आहे. गेल्या ३०० वर्षांपासून या स्मारकाच्या आसपासच्या भागातील शेतजमिनीचे मालकी हक्क वाघमोडे घराण्याकडे चालत आले आहेत. सरदार हिंदूराव वाघमोडे यांच्यासह सरदार यशवंतराव वाघमोडे आदींना महाराणी ताराराणी यांनी सन १७०२ साली सरंजामाच्या सनदा दिल्या होत्या. सरदार यशवंतराव वाघमोडे यांचे स्मारक माळशिरसजवळ भांबुर्डी येथे अस्तित्वात आहे. तर सरदार हिंदूराव वाघमोडे यांचे स्मारक माळशिरस येथे स्थित असल्याचा अंदाज लोखंडे व पिंगळे यांनी वर्तविला आहे. त्यामुळे माळशिरसमधील जोड समाधीचे स्मारक नेमके कोणाचे आहे, याचा निश्चित उलगडा होत नाही.