शिक्षकांच्या बदल्यांमध्येही गोंधळ , काही संवर्गाची प्रक्रिया लांबणीवर
बदल्यांमध्ये आरोग्य विभागापाठोपाठ आता शिक्षण विभागाचेही पितळ उघडे पडले आहे. शिक्षण विभागाचे नियोजन फसल्याने शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक शुक्रवारी पूर्णत: कोलमडले. विशेष म्हणजे विभागातील अधिकाऱ्यांनी रिक्त जागांचा तपशीलच दडवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कवींद्र बिनवडे यांच्या दक्षतेमुळे तो उघड झाला.
केवळ रिक्त जागांचा तपशीलच नाही, तर बदलीपात्र शिक्षकांची यादीही दडवण्याचा प्रयत्न विभागाकडून झाला. नियोजन कोलमडल्याने शिक्षकांमधील काही संवर्गाच्या बदल्या पुढे ढकलाव्या लागल्या. शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा उघड झाल्याने ही प्रक्रिया बिनवडे यांनी नंतर सामान्य प्रशासन विभागाकडे सुपूर्द केली.
जिल्हा परिषदेचे आवार सध्या बदल्यांमुळे गजबजून गेले आहे. शुक्रवारी शिक्षकांच्या बदल्या सुरू झाल्या. त्यामुळेच येथे जत्रेचे स्वरूप आले होते. बदल्या करण्यापूर्वी पात्र शिक्षकांची यादी जाहीर करणे आवश्यक होते. मात्र शुक्रवारी सकाळपर्यंत ही यादीच शिक्षण विभागाकडून तयार झालेली नव्हती. बदल्यांसाठी ‘पेसा’मधील उपाध्यापक तसेच मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख आदी संवर्गाला निमंत्रित करण्यात आले होते.
बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सीईओ बिनवडे यांनी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे रिक्त जागांचा तपशील तसेच बदलीपात्र शिक्षकांची यादी मागितली, ती तयारच नव्हती. सर्व रिक्त जागा उघड करा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्यावर जाहीर करण्यात आलेल्या जागांमध्ये बदल झाला, रिक्त जागांची संख्या सुमारे ३०ने वाढली. यात मोठा कालावधी गेला. सकाळी १० वाजता होणारी प्रक्रिया दुपारी एकच्या सुमारास सुरू झाली. त्यामुळे ‘पेसा’ उपाध्यापकांना बदली प्रक्रियेसाठी शनिवारी निमंत्रित करण्यात आले. आता पदवीधर व केंद्रप्रमुखांच्या बदल्या सोमवारवर ढकलण्यात आल्या आहेत. शुक्रवारी केवळ मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी अशा केवळ दोनच संवर्गातील बदल्या होऊ शकल्या. मुख्याध्यापकांच्या पेसामधील ४, समानीकरणातील २४ अशा एकूण २८ तर विस्तार अधिकाऱ्यांच्या १ प्रशासकीय व समानीकरणातील ३ अशा एकूण ४ बदल्या करण्यात आल्या. अनेक महिला शिक्षिका लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यांच्या त्रासात भर पडली. बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित बोरुडे, सहायक प्रशासन अधिकारी हृषीकेश बोरुडे आदींनी साहाय्य केले.