मास्क वापरणे सर्वांना बंधनकारक नसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत असून अनेक जण तो फॉरवर्ड करीत आहेत. मात्र, या व्हिडिओबाबतची सत्यता आता समोर आली आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओ?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बस स्थानकावर विनामास्क मोबाईलवर बोलत असते. दरम्यान, तिच्या जवळच बसलेल्या दोन व्यक्ती तिने तोंडावर मास्क न लावल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत तिला याबाबत विचारणा करतात. तुम्ही तोंडाला मास्क का लावलेलं नाही? असं त्यांनी विचारल्यानंतर डॉक्टर असलेली ही महिला त्यांना सांगते की, कोणत्याही सुदृढ व्यक्तीला मास्क लावायची गरज नाही. तर दवाखान्यात जाताना, कोणत्या आजारी व्यक्तीची देखभाल करताना किंवा तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तरच तुम्ही मास्कचा वापर करायला हवा. डॉक्टर महिलेच्या अशा सांगण्यावरुन तिला प्रश्न विचारणारे दोघे व्यक्ती निश्चिंत होऊन आपल्या तोंडावरील मास्कही काढतात आणि जाहिरात संपते.

आरोग्य विभागाचं म्हणणं काय?

ही जाहिरात सध्या व्हारल झाली आहे. मात्र, या जाहिरातीबाबतची सत्यताही आता समोर आली असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्य विभागानं म्हटलं की, “मास्कच्या वापराबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेब्रुवारी-मार्च या कालावधीतील आहे. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मास्क वापरणे सर्वांना बंधनकारक केलेले नव्हते. मात्र, आता देशात सर्वत्र मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.”

आरोग्य मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणानंतर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना असल्याचं समोर आलं आहे. WHO ने तेव्हा मास्क बंधनकारक असल्याच्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. लोकांमध्ये मास्कची अनाठायी भीती राहू नये म्हणून त्यावेळी ही जाहिरात मध्य प्रदेश सरकारने तयार केली होती. मात्र, सध्या आपल्या देशात करोनाचं संक्रमण हे उच्च पातळीवर पोहोचलं असल्यानं तोंडाला मास्क लावणे ही कोडिव-१९ संदर्भातील नियमावलीतील पहिलीच अट बनली आहे. त्यामुळे संबंधित व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.