उत्तर प्रदेशात जाण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशीही हजारो नागरिकांनी पालघर शहरातील आर्यन मैदानावर मोठा गोंधळ घातला. उत्तर प्रदेश राज्यात गुरुवारी तीन रेल्वे गाडय़ा सोडण्याचे नियोजन होते. मात्र अचानक दोन रेल्वेगाडय़ांना परवानग्या न मिळाल्याने जोनपूर येथे गाडी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र तीन रेल्वे गाडय़ा सुटणार असल्याचे गृहीत धरून या नागरिकांनी हजारोंच्या संख्येने पुन्हा गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.

दोन रेल्वेगाडय़ा रद्द केल्याचा संदेश विलंबाने आल्याने हे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर लागला. मात्र तीन रेल्वेगाडय़ा सुटण्याचे संदेश या आधीच मोठय़ा प्रमाणात समाजमाध्यमावरून पसरले होते. त्या अनुषंगाने पालघर जिल्हा व जिल्ह्य़ाबाहेरील नागरिकांनीही पालघरकडे या रेल्वे गाडय़ांमधून जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारप्रमाणेच गुरुवारीही ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाची मोठी दमछाक झाली.

अखेरीस जोनपूर येथे सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाडीसाठी ज्या नागरिकांना  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सांकेतिक क्रमांक प्राप्त झालेला आहे, त्यांना टोकन देऊन पालघर रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आले. पालघर स्थानकातून दोन हजार नागरिकांना या रेल्वेगाडीने उत्तर प्रदेशला पाठवण्यात आले.

खासगी व्यक्तीमार्फत टोकन वाटप

जौनपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाडीसाठी एका खासगी व्यक्तीमार्फत रेल्वे स्थानकाबाहेर पैसे देऊन टोकन वाटत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र तहसीलदारांनी पोलिसांना दिल्याचे समजते.

चौथी गाडी रवाना

प्रशासनामार्फत बुधवारी उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी तीन रेल्वे गाडय़ा सोडल्या असल्या तरी अनेक नागरिक पालघर रेल्वे स्थानकाबाहेर रांगा लावून प्रतीक्षेत होते. परिणामी प्रशासनाने रात्री उशिरा रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून चौथी रेल्वे गाडी उत्तर प्रदेशकडे रवाना केली.