शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी उपक्रमाबाबत थेट वरिष्ठांकडे खुलासा मागितल्याने खळबळ

प्रशांत देशमुख

वर्धा : अभिनव शैक्षणिक उपक्रम म्हणून पुरस्कृत ‘सेतू’ उपक्रमाबाबत शालेय पातळीवर कमालीचे गोंधळाचे वातावरण असतानाच आता शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी उपक्रमाबाबत थेट वरिष्ठांना खुलासा मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

करोनानिर्मित शैक्षणिक संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय पुढे येत आहे. ‘सेतू’ हा उपक्रम शालेय पातळीवर अध्ययन व अध्यापन सुरळीत करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाची उजळणी तसेच चालू शैक्षणिक वर्षांतील अभ्यासक्रमाची पूर्वतयारी असा उद्देश ठेवून ‘सेतू’ अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. अगोदरच्या इयत्तेत अभ्यास करताना राहून गेलेला भाग व पुढील इयत्तेतील अभ्यास यातील सेतू म्हणजेच हा उपक्रम असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शालेय पातळीवर कमालीचा गोंधळ उडालेला दिसून येत आहे. ‘सेतू’ अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफ लाईन राबवण्याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याचा मुख्य आक्षेप आहे. चालू वर्षांच्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध नाही.

४५ दिवसात ‘सेतू’ पूर्ण करायचा असून त्याखेरीज नियमित अभ्यासक्रमाला सुरुवात न करण्याचे स्पष्ट निर्देश आहे. म्हणजेच शालेय अभ्यासक्रम सुरू न करता ‘सेतू’ अभ्यासक्रम कोणतीही सुट्टी न घेता १४ ऑगस्टपर्यत पूर्ण करायचा आहे. मात्र सुट्टीच्या कालावधीत अभ्यासक्रम होत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. मुलांकडे मोबाईल नाही, हा मुद्दा अनुत्तरित ठेवून ‘सेतू’ची निर्मिती प्रश्नांकित ठरते. अशिक्षित पालकांनी पाल्यांना सूचना कशा करायच्या. ऑनलाईन शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यत पोहोचणे शक्य नसल्याने इतर विद्यार्थ्यांबाबत प्रश्नचिन्ह आहे. ‘सेतू’मधून उर्दू माध्यमासाठी विषय उपलब्ध झालेले नाही, असे प्रश्न पुढे येत आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी नाही. असलाच तर साधा आहे. अशा विद्यार्थ्यांना ‘सेतू’बाबत माहिती एकत्रित करून, भेटून की शाळेत बोलावून करायचे, असा थेट सवाल शिक्षक करतात.

या प्रश्नाचे निराकरण न झाल्याने गोंधळात भर पडत आहे. राज्यातील बहुतांश जिल्हय़ातून शंकेचे मोहोळ उठले असतानाच रत्नागिरीच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने सेतूबाबत २५ प्रश्न उपस्थित करीत त्याचा खुलासा थेट शिक्षण आयुक्तांना मागण्याचे धाडस दाखवले आहे. संस्थेच्या प्राचार्यानी भ्रमणध्वनी नसलेल्या मुलांसाठी ८० पानांच्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती द्यायच्या कां, असा सवाल करीत आर्थिक तरतुदीचे स्पष्टीकरणही मागितले आहे. खात्यातील कनिष्ठांनी कर्त्यांधर्त्यांना उपक्रमाबाबत शंका विचारतांनाच प्रश्न असतील तर शाळाच कां सुरू करू नये, अशी विचारणा केल्याने शालेय वर्तुळ हादरून गेले आहे. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतिश जगताप हे म्हणाले की, ‘सेतू’बाबत सविस्तर मार्गदर्शन अपेक्षित आहे. शाळेतील अभ्यासक्रम की ‘सेतू’चा अभ्यासक्रम यापैकी कशाला प्राधान्य द्यायचे, हेच स्पष्ट नाही. याबाबत वरिष्ठांशी बोलल्याखेरीज मार्ग निघणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) या संस्थेच्या वरिष्ठांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. तर संचालक दिनकर टेमकर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तसेच लघुसंदेश ठेवूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.