News Flash

लसीकरणातील गोंधळामुळे नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले

करोना प्रतिबंधक लसीकरणातील गोंधळाबद्दल महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी आयुक्त शंकर गोरे यांना धारेवर धरले.

(संग्रहित छायाचित्र)

नगर : करोना प्रतिबंधक लसीकरणातील गोंधळाबद्दल महापालिकेच्या सभेत नगरसेवकांनी आयुक्त शंकर गोरे यांना धारेवर धरले. लसीकरणासाठी किती मात्रा (वायल) महापालिकेला उपलब्ध झाल्या याची माहितीही आयुक्त सभेत देऊ शकले नाहीत. या विषयावरून नगरसेवकांनी केलेल्या कोंडीतून आयुक्तांची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी चर्चा आटोपती घेऊन त्यांची सुटका केली. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले, मात्र तरीही त्यांचे मनपाच्या केंद्रावर लसीकरण केले जात असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. दरम्यान शहरात गुरुवापर्यंत ८३ हजार १३१ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

महापौर वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा ऑनलाइन झाली. ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी शहरात कोणत्या केंद्रावर किती लसीकरण झाले याची माहिती आयुक्तांना मागितली. मात्र आकडेवारी सादर करण्यासाठी आयुक्तांनी वेळ मागून घेतला. त्यानंतरही मनपाला लसीकरणाच्या किती मात्रा उपलब्ध झाल्या याची माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी नंतर सांगितले. सरकारने १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरीही त्यांचे मनपा केंद्रात लसीकरण केले जाते, त्यामुळे ४५ ते ६० वयोगटातील नागरिक त्यापासून वंचित राहत आहेत, त्यांना तासनतास केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. आवश्यकता भासल्यास आपण त्याचे पुरावेही देऊ शकतो असे आव्हानही त्यांनी दिले.

डॉ. सागर बोरुडे यांनीही त्याला दुजोरा देत वयोवृद्ध लोकांवर लसीकरणात अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाखाली इतरांचे लसीकरण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. लशीच्या कमी संख्येने मात्रा उपलब्ध होतात, असे समर्थन आयुक्तांनी केले. मात्र डॉ. बोरुडे यांनी उपलब्ध मात्रामध्येच योग्य नियोजन व्हायला हवे, याकडे लक्ष वेधले.

योगीराज गाडे यांनी लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली. लसीकरणात नगरसेवक हस्तक्षेप करतात, त्यामुळे त्याचे चांगले चित्र निर्माण झाले नाही. लसीकरण सरकारी ठिकाणीच करा, नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांंना लसीकरण केले जाते मात्र सामान्य नागरिक वंचित राहत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रांवर झालेल्या लसीकरणाची आकडेवारी नगरसेवकांना अखेपर्यंत मिळालीच नाही. महापौर वाकळे यांनीही या विषयावरील चर्चा आटोपती घेतली.

सीना नदी सफाईच्या कामात सहकार्य सप्लायर्स अँड अर्थमूव्हर्स या ठेकेदाराने प्रत्यक्ष काम केले त्यापेक्षा अधिक बिल सादर केले. मनपानेही ते आदा केले, याकडे लक्ष वेधत उपमहापौर मालन ढोणे यांनी या ठेकेदाराला काळ्यायादीत टाकण्याची व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

महापौर वाकळे-नगरसेवक शिंदे चकमक

लसीकरणाच्या विषयावरील चर्चेत महापौर वाकळे व नगरसेवक अनिल शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मुकुंदनगर मधील नगरसेवक असिफ सुलतान यांनी लसीकरणातील गोंधळाला दुजोरा दिला. मात्र महापौरांनी त्यांना तुम्ही मध्येच बोलू नका, असे सांगत खाली बसण्यास सांगितले. मात्र अनिल शिंदे यांनी त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून महापौरांनी कोणाला बोलू द्यायचे हा माझा अधिकार आहे, तुम्ही सांगू नका, असे शिंदे यांना सुनावले, त्यावरूनही शाब्दिक चकमक रंगली.

ओढे-नाल्याच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटी

शहरातील ओढे-नाले सुशोभीकरणासाठी हरित लवादाकडून सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये शहरातील ९ ओढे-नाल्यांचा समावेश करण्यात आला आहे. हरित लवादाने विविध महापालिकांना आकारलेल्या दंडाच्या एकत्रित रकमेतून लवादाने नाले-ओढे यांच्या सुशोभीकरणासाठी हा निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे, परंतु पुढील निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

महापौर व आयुक्तांच्या अभिनंदनाचा ठराव

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणी योजना मार्गी लावण्यासाठी महापौर वाकळे व आयुक्त गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यातील अडथळे दूर केले, याबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांनी दोघांचे अभिनंदन केले. महापौरांनी नियमात न बसणाऱ्या अडचणींवर कशी मात केली, याचे उदाहरण देत आयुक्तांनी गौरवोद्गार काढले. दि. ३० जूनपर्यंत अमृत पाणी योजना मार्गी लावायचा प्रयत्न असल्याचेही गोरे यांनी सांगितले.

नाले-गटारे सफाईचा विषय गाजला

सभेत पावसाळ्यापूर्वीच नाले-गटारी करण्याचा सफाईचा विषयही गाजला. सभापती अविनाश घुले, प्रकाश भागानगरे आदींनी या विषयावर चर्चा घडवून आणली. नाले-गटारी साफ केले जातात मात्र गाळ काढून तो तसाच रस्त्यावर टाकला जातो. हा गाळ पुन्हा नाले-गटारांमध्ये जातो मनपाचा निधी वाया जातो. रस्ते निसरडे होऊन अपघात होतात, ठेकेदार केवळ मला गाळ काढण्याचे काम दिले आहे. गाळ उचलण्याचे नाही, असे सांगून जबाबदारी टाळतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्याची दखल घेण्याचे मान्य केले. महापौर वाकळे यांनी नालेसफाईच्या कामाला उशीर झाला, हे काम जानेवारी-फेब्रुवारीमध्येच व्हायला हवे होते, असे सांगत नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:21 am

Web Title: confusion vaccination corporators took the commissioner ssh 93
Next Stories
1 पालक हिरावलेल्या पाल्यांना चांदा शिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रवेश – डॉ. जीवतोडे
2 ‘राजारामबापू’च्या प्रयोगशाळेकडून ‘राजाराम द्रावण’ची निर्मिती
3 नवी मुंबई विमानतळ नामकरण  आंदोलनाला भाजपची रसद?
Just Now!
X