प्रस्तावित महसूल आयुक्तालयासंदर्भात भाजप नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी गुरुवारी येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बठकीकडे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
महसूल व वन विभागाने १६ फेब्रुवारीला जारी केलेल्या अधिसूचनेमुळे सोमवारी (दि. २३) येथे होऊ घातलेल्या आयुक्तालयाची स्थापना अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर पडली. ही बाब दोन दिवसांपूर्वी समोर आणल्यानंतर या विषयावर सत्ताधारी भाजपसह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी-पदाधिकारी सक्रिय झाले. परंतु राज्याच्या राजकारणात विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या विषयात दाखविलेली अनास्था ठळकपणे पुढे आली.
खतगावकर यांनी सर्वपक्षीय बठकीसंदर्भात सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना संदेश दिला होता. त्यानुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांचे प्रतिनिधी बठकीला हजर होते. आयुक्तालयाची स्थापना लांबणीवर टाकण्याच्या सरकारच्या कृतीवर खतगावकरांसह माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर आदींनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या तीन आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे रामनारायण काबरा, मनसेचे प्रकाश मारावार यांनीही सरकारच्या नव्या भूमिकेचा समाचार घेतला; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर-उपमहापौर यांच्यापकी कोणीही या बठकीकडे फिरकले नाही.
या पाश्र्वभूमीवर खतगावकर यांनी काँग्रेसवर टीका केली. आयुक्तालयाचे मुख्यालय नांदेड येथे करण्यास लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे विरोध दर्शविला. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही होते. या मुद्दय़ावर खतगावकर यांनी काँग्रेससह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. आयुक्तालयाचा निर्णय मी केला, असे माजी मुख्यमंत्री म्हणतात. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले दोन जबाबदार नेते लातूरची कड घेत असल्याच्या मुद्दय़ाकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, ओमप्रकाश पोकर्णा काल शहरातच होते. रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात खासदार चव्हाण यांनी आयुक्तालयासंदर्भात वक्तव्य केले. पण सर्वपक्षीय बठकीवर काँग्रेसचा अघोषित बहिष्कार दिसून आला. या संदर्भात आता ठोस कृती करण्याची वेळ आली असताना काँग्रेसची अलिप्तता ठळकपणे पुढे आली. याच वेळी सत्तेतील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आयुक्तालयासंदर्भातील नवा आक्रमक सूर बठकीच्या माध्यमातून पुढे आला.
डॉ. किन्हाळकर यांनी बठक सुरू असतानाच महसूलमंत्री खडसे, तर भास्कररावांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी थेट संपर्क साधून बठकीतील उपस्थितांची भावना त्यांच्या कानावर घातली. शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे व हेमंत पाटील हे आमदार उशिरा आले. त्यांनी आम्ही सर्वासोबत आहोत, असे स्पष्ट केले. बठकीला राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुत्रे, मििलद देशमुख, चतन्यबापू देशमुख, पत्रकार गोवर्धन बियाणी, प्रवीण साले, बालाजी बच्चेवार, हर्षद शहा, उमाकांत जोशी आदी उपस्थित होते.