राज्य सरकारने सावकारी कर्ज माफ केल्याच्या घोषणेनंतर कोणत्या सावकाराने किती कर्ज शेतकऱ्यांना दिले होते आणि कोणाचे कर्ज माफ झाले, या विषयी माहितीच्या अधिकारात विरोधी पक्षनेता म्हणून अर्ज केला होता, पण सरकारने उत्तर काही दिले नाही. त्यांनी केलेल्या सगळ्या योजना फसव्या आहेत. केवळ नाव बदलून फारसे साध्य होणार नाही. त्यामुळेच दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीत राज्य सरकारविरोधात तालुका व जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. औरंगाबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
केंद्रातील भ्रष्ट मंत्र्यांना सरकार पाठीशी घालत आहे. रेडकॉर्नर नोटीस बजावलेल्या व्यक्तीसाठी सुरू असणारा हा प्रकार गैर असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यावर निवेदन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतच नसल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील मंत्री बोगस पदवीधारक आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांना क्लीन चिट देत आहेत, असा आरोपही विखे पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री खडसे यांच्यात मतभेद आहेत. ‘तुमचे पटत नाही म्हणून जनतेला का होरपळत ठेवता,’ असा सवाल विखे पाटील यांनी केला. चारा छावण्या उघडण्यासाठी टाकण्यात आलेली सॉल्वन्सीची अट रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘महाविद्यालयांतील उपाहारगृहांना धान्यपुरवठा करा’
दुष्काळात होरपळणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, म्हणून विद्यापीठ व महाविद्यालयांच्या उपाहारगृहांना मोफत धान्यपुरवठा सुरू करावा. दुष्काळामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना गावी जाऊनही त्यांचा उपयोग नाही. त्यामुळे त्यांचे शुल्क माफ करून उपाहारगृहांमधून त्यांना मोफत जेवणाची सोय करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
‘त्यात काही तथ्य नाही’!
नगर जिल्ह्य़ातील प्रवरानगर येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावर बसणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षबदलाबाबतच्या अफवा सामाजिक संकेतस्थळावरून फिरत होत्या. ते भाजपत जाणार अशी चर्चा सुरू असल्याबद्दल विचारले असता, ‘व्हाटसअॅपवर कोणाचेच नियंत्रण नाही. पण त्यात काही तथ्य नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले.