अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सातत्यानं भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं म्हणत तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं ही भूमिका घेतली होती. या भूमिकेवरून काँग्रेसनं कंगनाला सल्ला देताना राम कदमांच्या वर्मावर बोट ठेवलं आहे.

भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असंही कंगना म्हणाली होती.

आणखी वाचा- अभिनेत्री कंगना रणौतला संजय राऊत यांनी सुनावलं; म्हणाले…

कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसनं तिला सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून तुम्ही राम कदम यांच्यापासून घाबरून राहायला हवं, असं म्हटलं आहे. “कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी ती फार धोकादायक आहे,” असं म्हणत सावंत यांनी कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, राम कदमांच्या मागणीवर कंगनाचं उत्तर

कंगना ट्विटमध्ये मुंबई पोलिसांबद्दल काय म्हणाली होती?

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं.