मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्यास काँग्रेसचा विरोध असल्याने निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी घोषित होऊ शकला नाही. भाजप-शिवसेना युतीमुळे हे पद शिवसेनेला दिले जाणार असून अपक्ष आमदारांचा कल कोणाकडे यानुसार संख्याबळ ठरू शकते.

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यावर रिक्त असलेल्या उपसभापती पदावर शिवसेनेचा दावा असून डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप शिवसेनेने ही निवडणूक घेण्याबाबत सभापती रामराजे निंबाळकर यांना प्रस्तावही दिला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे सत्तारूढ भाजप-शिवसेनेचे प्रयत्न आहेत. मात्र त्यास काँग्रेसचा विरोध असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसकडे बहुमत असल्याचा त्यांचा दावा आहे, असे ज्येष्ठ भाजप मंत्र्याने सांगितले. काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी हे आजारी असून प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात येण्यास शिवसेनेचा विरोध आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे.