सोलापूरच्या जात पडताळणी कार्यालयातून जात पडताळणी दाखले वेळेवर मिळत नाहीत तसेच केंद्र सरकारकडून विशेष इतर मागासप्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील (एसबीबी-ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती थांबविण्यात आल्याचा प्रश्न हातात घेऊन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी दुपारी प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांच्या राजकीय वाटचालीतील रस्त्यावर उतरून केलेले हे पहिलेच आंदोलन ठरले.
केंद्राने गेल्या तीन वर्षांंपासून विशेष इतर मागासवर्ग व इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबविली असताना आता केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरच हे आंदोलन कसे करण्यात आले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करीत, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी ही राजकीय स्टंटबाजी चालविल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांसह बीसी व ओबीसी वर्गातून केला जात आहे. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने अडविलेल्या शिष्यवृत्तीचा ठपका नरेंद्र मोदी यांच्यावर का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
सात रस्ता येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी. जी. आरवत यांना भेटून निवेदनही सादर करण्यात आले. ओबीसी व बीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती व जात पडताळणी प्रमाणपत्रांना होणारा विलंब, हा जुनाच प्रश्न आहे. आतापर्यंत विरोधकांनी या प्रश्नावर आंदोलने केली तर आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी निवेदने देऊन, संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका लावून पाठपुरावा केला होता. परंतु आता याच प्रलंबित प्रश्नावर त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. जात पडताळणी समितीकडून कमालीचा विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना व गरजूंना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाहीत. या प्रश्नावर प्रशासन संवेदनशील नाही, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. येत्या काही दिवसात न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
‘व्हीआयपी’ थाटात झालेल्या या आंदोलनात महापौर अलका राठोड यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महापालिका स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री, माजी महापौर आरीफ शेख, नगरसेवक मधुकर आठवले, संजीवनी कुलकर्णी, अमोल शिंदे, प्रा. ज्योती वाघमारे, मनोज यलगुलवार, सिद्धाराम चाकोते, श्रीदेवी फुलारे, सरस्वती कासलोलकर आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. प्रारंभी आंदोलकांनी डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यानंतर आंदोलक प्रवेशव्दार ढकलून आत घुसले. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही आंदोलकांना न रोखता उलट, ‘व्हीआयपी’ वागणूक दिल्याचे दिसून आले.