ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशी खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नागपुरात झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमवारपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकाच्या चहापानावर विरोधकांनी प्रथेप्रमाणे बहिष्कार घातला आणि सरकारविरोधी भूमिका मांडत पत्रकार परिषदेत टीकाही केली. सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांचे शतक पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो असा टोलाही या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्या केली याचे कारण सरकारमधील मंत्र्यांना भेटूनही त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला नाही असा आरोप त्यांनी केला. तीन वर्षांच्या कारकिर्दीत १० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. ज्या ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला त्यांची नावे राज्य सरकारच्या वेबसाईटवर तातडीने प्रसिद्ध करावीत म्हणजे खरे काय आहे ते समोर येईलच असे आव्हानही त्यांनी दिले.

गुजरातमध्ये विकास वेडा झाला, महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. विदर्भातला एकही शेतकरी समाधानी नाही, राज्यातल्या शेतकऱ्यांचीही अवस्था काही वेगळी नाही. या सरकारची प्रत्येक योजना ऑनलाइन आहे कारण या सरकारचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. एवढेच नाही तर जसा गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

युती सरकारच्या काळात राज्य दिवाळखोरीच्या दिशेने चालले आहे. आघाडीचे सरकार असताना ओबीसींची शिष्यवृत्ती ५५० कोटी होती ती या सरकारच्या काळात फक्त ५० कोटींवर आली आहे असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सरकारवर टीका केली.