कोल्हापूरच्या पुराला आघाडी सरकार जबाबदार आहे. पंचगंगा नदीची पूररेषा बांधकाम व्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलली नाही तर आघाडीच्या काळातच ती बदलण्यात आली असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. २००५ मध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला होता. त्यावेळी पूररेषा आखण्यात आली होती. मात्र त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंचगंगा नदीची पूररेषा बदलली असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या सांगण्यावरुन पूररेषा बदलल्याचा आरोप झाला होता. मात्र या आरोपात काहीही तथ्य नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे महापालिकेच्या आढावा बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची पूररेषा बदलली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याच प्रश्नाला उत्तर देत असताना चंद्रकांत पाटील यांनी ही पूररेषा आघाडीच्या काळातच बदलली गेली असल्याचं म्हटलं आहे. पुणे अलमट्टी धरणाची उंची केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असताना वाढवण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी आलेला पूर हे नैसर्गिक संकट आहे मात्र या पुराला आघाडी सरकारही जबाबदार आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मागील काही वर्षांचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कोयना, अलमट्टी धरणातून राज्यातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाकडे पाणी कसे वळवता येईल या दृष्टीने सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आरोप झाला होता?

सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याला कारण आहे ते कोल्हापूरच्या पूररेषेत करण्यात आलेला बदल. निळ्या आणि लाल पूररेषेत डीपीमध्ये बदल करण्यात आला. यासाठी स्थानिक प्रशासन, क्रेडाई या बिल्डर संस्थेतले काहीजण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी पूररेषा नदीच्या आतील भागात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी केला. मात्र या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.