काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या नेमणुका पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेने करण्याची पद्धत रुढ झाली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सहा नव्या जिल्हाध्यक्षांची नावे दिल्लीहून जाहीर झाली आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विेवेदी यांच्या सहीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही बाब स्पष्ट झाली आहे. गोिवदराव पाटील नागेलीकर (नांदेड), सुरेश जेथलिया (जालना), राजेंद्र मुळक (नागपूर ग्रामीण), बबनराव चौधरी (अकोला शहर), प्रेमसागर गणविर (भंडारा), राहुल बोंद्रे (बुलढाणा) या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर झाली आहेत. नागेलीकर यांच्या रुपाने नांदेड जिल्हा काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.

यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा दिल्लीतूनच झाली होती, त्याच वेळी काही जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली होती. नांदेड जिल्हाध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या भागांतील ४ कार्यकत्रे इच्छुक होते; चव्हाण दाम्पत्याने मुदखेड तालुकाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांना पसंती दिली.

नागेलीकर यांचे नाव सहा महिन्यांपासून चच्रेत होते; पण दावे-प्रतिदावे तसेच पक्ष स्तरावरील इतर घडामोडी यामुळे त्यांच्या नियुक्तीची बाब लांबणीवर पडत गेली.  खासदार चव्हाण नांदेडला येऊन परत गेले तरी नागेलीकरांच्या नावाची घोषणा झाली नाही; पण बुधवारी सायंकाळ नंतर द्विवेदी यांनी प्रसिद्धपत्रक जारी करुन एक प्रलंबित विषय निकाली काढला.

दरम्यान, नागेलीकर यांनी नव्या पदाची सूत्रे गुरुवारी सकाळी स्वीकारली. जिल्हा काँग्रेस कार्यालयात कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार अमिता चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम प्रभृती या वेळी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांसाठी असलेली गाडी कदम यांच्याच ताब्यात होती, ती त्यांनी नव्या अध्यक्षांच्या हवाली केली. जिल्हा काँग्रेसचा कारभार १६ तालुक्यांत विखुरलेला; सभासद संख्या प्रचंड, पण या पक्ष संघटनेचे कोणत्याही बँकेत खाते नाही. पक्षाच्या मालमत्तेबाबतची कागदपत्रे नव्या जिल्हाध्यक्षांच्या स्वाधीन करण्यात आले.