महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार असून सर्व ३७ प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे मुंबईत मुख्यमंत्र्यांसह स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झाल्याने पक्षाचे सहयोगी सदस्य आ. मनिष जैन यांचे डावपेच उधळले गेल्याचे म्हटले जात आहे.
दोन दशकांत तत्कालीन नगर पालिका व नंतर महापालिका निवडणुकीत एकही उमेदवार विजयी होऊ न शकलेल्या काँग्रेसने यावेळी स्वबळावर लढण्याचे कोणत्या आधारावर ठरविले, असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. त्यातच काँग्रेसचे सहयोगी सदस्य आ. मनिष जैन हे आ. सुरेश जैन यांच्या आघाडीसोबत काँग्रेसची फरफट करत असल्याची चर्चा होती.  काँग्रेसचे महानगर अध्यक्ष सलिम पटेल हे मनिष जैन यांच्या प्रभावाखाली असल्याचे लक्षात येताच पक्षाच्या अन्य स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रदेश काँग्रेस समितीकडे त्यासंदर्भात अहवाल पाठविला. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकारी व पक्षाचे सहयोगी सदस्य आ. शिरीष चौधरी तसेच आ. मनिष जैन यांची बैठक होऊन महापालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रचारासाठी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसचे अनेक नेते जळगावात येणार असल्याचे काँग्रेस भवनातून सांगण्यात आले. दरम्यान, काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे मनिष जैन हे एकाकी पडल्याचे म्हटले जात असून उमेदवार निश्चित करताना निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात येऊ नये, असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे.