भाजपा सरकारविरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत दिली. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, प्रसारमाध्यमांची गळचेपी केली आहे. देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत, १५ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आयुष्य संपवले आहे. बेरोजगारीचे संकट देशावर आहे. या सगळ्याचा निषेध आम्ही जनसंघर्ष यात्रेतून करणार आहोत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजपाने आत्तापर्यंत फक्त मोजक्या उद्योजकांचा विकास केला, या सरकारला सामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली. ३१ तारखेला सुरू होणारी ही जनसंघर्ष यात्रा ७ व ८ सप्टेंबरला पुण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.