काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असं शिवसेनेकडून लिहून घेतलं असल्याचं सांगितलं आहे. तसंच शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले असंही यावेळी त्यांनी सांगितलं. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसं त्यांनी लिहून दिलं असल्यानेच सरकार स्थापन झालं,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे मल्टिस्टारर, तीन हिरो पाहिजेत
“राजकारण, चित्रपट-नाटक क्षेत्र जवळपास सारखेच आहेत. आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा आहे. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. आम्ही एकत्र येऊ असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत. त्यामुळेचं आमचं सरकार आलं,” असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे
अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, “तीन पक्षांचं हे सरकार चालणार कसं असा प्रश्न विचारला जात होता. तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. दिल्लीत आम्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली असता त्यांनी नकार दिला. रोज भांडणं होतील. हे सरकार चालणार कसं ? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर आम्ही चिंता करु नका सांगितलं. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यामुळे चिंता करु नका”.