या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘त्यांनी’ काही दिवस तिकडेच राहावे

निवडणूक काळात काँग्रेस पक्ष सोडून गेलेले काही ‘मित्र’ मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ आहेत, फसवणूक झाल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. मात्र आता त्यांची जागा दुसऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मित्रांनी आता काही दिवस तरी तिकडेच राहावे, असा सल्ला मंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. या मित्रांमध्ये आ. राधाकृष्ण विखे यांचा समावेश आहे का, असा प्रश्न केला असता थोरात यांनी ते विखे यांनाच विचारा असे टोला लगावला.

मंत्री झाल्यानंतर थोरात यांचे प्रथमच हेलिकॉप्टरने शहरात आगमन झाले. त्या वेळी त्यांचे राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर स्वागत केले. या वेळी काँग्रेसचे आ. लहु कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे,  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, किसनराव लोटके, डी. एम. कांबळे, निखिल वारे, प्रवीण घुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील आदींनी मंत्री थोरात यांचे स्वागत केले.

जे पक्ष सोडून गेले त्यांच्या जागा आता भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पक्षात पुन्हा यायचे आहे, त्यांच्यासाठी जागा रिकामी नाही, यायचे असेल तर ज्यांनी जागा भरल्या त्यांचाही विचार घ्यावा लागेल, असे थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खातेवाटप व मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हैदराबादेतील तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आलेल्या घटनेतील गुन्हेगारांना जाहीरपणे चौकात फाशीवर लटकवले जाणे आवश्यक आहे, असे खटले जलदगती न्यायालयापुढे चालावेत, जलदगती न्यायालयांसाठी देशपातळीवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे, तसेच गुन्हेगारांना धाक वाटेल, असे कडक कायदे हवे आहेत, यासाठी आपणी प्रयत्न करु, असे थोरात यांनी सांगितले.

‘जि.प.मध्ये यशस्वी होऊ’

जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच होत आहे, याकडे लक्ष वेधले असता मंत्री थोरात म्हणाले की, योग्य वेळी त्याचाही निर्णय होईल, ज्या वेळी निर्णय होईल, त्या वेळी आम्ही जिल्हा परिषदेत यशस्वी होऊ. हेलिपॅडवर थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेती महामंडळाच्या जमीनीचे शेतक ऱ्यांना वाटप करण्याची प्रकरणे लवकर मार्गी लावण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी थोरात यांचे रखडलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामातील अडचणींकडे लक्ष वेधले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress balasaheb thorat vidhan sabha election akp
First published on: 07-12-2019 at 02:30 IST