News Flash

पराभवानंतर काँग्रेस प्रबळपणे सत्तेवर आल्याचा इतिहास -सुशीलकुमार शिंदे

सामन्यजनतेसाठी भांडणारे म्हणून विलासकाकांना मी माझ्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून घेतले.

Shushilkumar Shinde
काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला आणि विरोधक काँग्रेस संपली असे म्हणतात. तेव्हा, काँग्रेस पुन्हा प्रबळपणे सत्तेवर आली असल्याचा इतिहास आहे. सत्तेवर येण्यासाठी आम्ही बटण दाबून वेगळं काही केलं नाही. पण, आता मतपत्रिका हवी यासाठी उठाव व्हावा, आणि तसा निर्णय होण्यासाठी प्रसार माध्यमांनी दबावाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या चले जाव लढय़ाचा अमृत महोत्सव तसेच ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा आणि त्यांच्या रयत संघटनेचा सुवर्ण महोत्सव अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची उपस्थिती होती. या वेळी विलासकाका उंडाळकरांचा मानपत्र व चरख्याची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

शिंदे म्हणाले, की गुजरातमध्ये राज्यकर्त्यांवर संताप व्यक्त होतोय हीच परिस्थिती सर्वत्र असून, मतलबी सरकार लवकरच संपेल. जेव्हा-जेव्हा काँग्रेस संपली म्हणणारी सरकारं आली पण, ती पत्त्याच्या डावासारखी कोसळलीही. विरोधकांची काँग्रेस संपवण्याची जेव्हा भाषा झाली अशा, तिन्ही वेळेस काँग्रेस ताकदीने सत्तेवर आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. आमच्यासाठी आज आत्मचिंतनाची वेळ आली असल्याचे त्यांनी कबूलही केले. सामन्यजनतेसाठी भांडणारे म्हणून विलासकाकांना मी माझ्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून घेतले. तेथेही त्यांनी सर्वसामान्यांची बाजू लावून धरल्याचे समाधान शिंदे यांनी व्यक्त केले.

सत्कारास उत्तर देताना उंडाळकर यांनी कराड दक्षिणच्या जनतेने भरभरून प्रेम दिल्याबद्दल त्यांच्या प्रति कृतार्थ भावना व्यक्त करताना, माझ्या इतका समाधानी लोकप्रतिनिधी दुसरा कोणी नसावा असे नमूद केले. उपेक्षित व दुर्गम डोंगराळ जनतेला न्याय देण्यात यश आले. आपले जीवन सर्वसामान्य जनतेला समर्पित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी, थकलेला नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा संघर्षांचे संकेत दिले. सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून, ती कोणाची मेहरबानी नव्हेतर, ती माझ्या सामान्य जनतेची शक्ती असल्याचा अभिमान उंडाळकरांनी व्यक्त केला. माझ्या नसानसात वडिलांनी दिलेला समाजवाद भिनला असून, मी या विचारधारेपासून कदापि दुरावू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. विकास, प्रबोधन व परिवर्तनाचा विचार घेऊन लढणाऱ्यापैकी मी यशवंतराव चव्हाणांचा सामान्य कार्यकर्ता आहे. आता, वैचारिक बंडखोरी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी विलासकाका उंडाळकर यांच्या गेल्या पन्नास वर्षांतील राजकीय, सामाजिक कार्याचा आढावा घेताना, त्यातील वैशिष्टय़ांच्या बाबींवर ऊहापोह केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 2:03 am

Web Title: congress came to power after the defeat says shushilkumar shinde
Next Stories
1 ‘त्या’ मुलींचे पालकत्व स्वीकारण्याची संस्थांची तयारी
2 आयारामांच्या उमेदवारीवर गडकरींची नापसंती
3 देशमुख यांच्या निवडीमुळे मसापचा प्रभाव पुन्हा सिद्ध!
Just Now!
X