सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून प्रा. सिद्धार्थ जाधव, खानापुरातून सदाशिव पाटील आणि पलूसमधून स्वत: डॉ. पतंगराव कदम यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली असल्याची माहिती बुधवारी डॉ. कदम यांनी पत्रकार बठकीत दिली. जत आणि शिराळा येथील जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी केवळ जतची जागा काँग्रेसला मिळेल असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मोदी यांची सुनामी संपली असल्याचे सांगत कदम म्हणाले की, राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होणारच आहे. मात्र उभय पक्षाच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची राष्ट्रवादीची मागणी अयोग्य असून जागावाटप आणि अन्य बाबींसंदर्भामध्ये बोलणी सकारात्मक पातळीवर सुरू असून सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल. आपण मतदार संघात असलो तरी उभय पक्षातील घडामोडीकडे आपले लक्ष असून कोणत्याही स्थितीत आघाडीच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिराळा आणि जतसाठी आमचे उमेदवार तयार आहेत. मात्र काँग्रेसला ५ आणि राष्ट्रवादीला ३ असे मतदारसंघ देण्याचे आघाडीचे धोरण असल्याने शिराळा मित्रपक्षाला जाईल आणि जत काँग्रेसला मिळेल असेही कदम यांनी सांगितले. मतदारसंघामध्ये आपण विकासाच्या कामावर लोकांना सामोरे जात असल्याने आपणास विरोधकांची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही असे सांगून या मतदार संघात केलेले विकासाचे कामच मला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.