आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या चार दिवसांत जाहीर होणार आहे. पक्षाचा जाहीरनामाही लवकरच प्रसिध्द होणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शनिवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. या वेळी त्यांनी पक्षाचे सर्व नगरसेवक, विभागस्तरावरील पदाधिकारी यांच्या कार्याचा आढावाही घेतला. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने यांच्यासह महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी आदींची उपस्थिती होती.
सोलापूरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून काल काय झाले, कोण कोठे गेले याची चिंता न करता मागच्या लोकसभा निवडणुकीतील चुका सुधाराव्यात आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापुरातील तिन्ही जागा जिंकण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. जाती-धर्मात फूट पाडणा-या संकुचित जातीयवादी विचारांविरोधात आमची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापुरातील तिन्ही जागा काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. या प्रसंगी शिंदे यांनी विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघातील मतदानकेंद्रनिहाय कामाचाही आढावा घेतला.