News Flash

आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये पालकमंत्र्यांसमोर शाब्दिक खडाजंगी

या बैठकीत काँग्रेस नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी खनिज विकास निधीचे वाटप करण्याचा निर्णय झाला.

विजय वडेट्टीवार

निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणाऱ्या माजी महापौरांच्या प्रभागात निधी देण्याच्या मागणीवरून वाद

चंद्रपूर : भाजपला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या माजी महापौर संगीता अमृतकर यांच्यासह ११ माजी नगरसेवकांच्या प्रभागात खनिज विकास निधी द्यावा, अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. त्यावेळी  माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. यावरून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमोर आजी व माजी शहर अध्यक्ष तिवारी- नागरकर यांनी एकमेकांना शिवीगाळ करीत दंड थोपटण्याचा प्रकार सोमवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत झाला. सर्वासमक्ष हा प्रकार घडल्याने सारेच अवाक् होऊन विकोपाला गेलेले भांडण बघत होते.

आगामी महापालिका निवडणूक बघता पालकमंत्री वडेट्टीवार यांनी काँग्रस नगरसेवकांची बैठक विश्रामगृह येथे आयोजित केली होती. या बैठकीत काँग्रेस नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी खनिज विकास निधीचे वाटप करण्याचा निर्णय झाला. ही बैठक सुरू असतानाच तिवारी यांनी २०१५ मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला थेट मदत करणाऱ्या माजी महापौर संगीता अमृतकर, अपक्ष नगरसेवक पिंटू शिरवार यांच्यासह ११ माजी नगरसेवकांची यादी पालकमंत्र्यांकडे देत त्यांच्याही प्रभागात खनिज विकास निधी देण्यात यावा, अशी मागणी केली. त्याला नागरकर यांनी आक्षेप नोंदवला. भाजपला मदत करणाऱ्या माजी महापौरांसह ११ नगरसेवकांना निधी देऊ नये, याउलट २५ व ५० मतांनी पराभूत झालेल्या काँग्रेस नगरसेवकांना निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. माजी महापौर संगीत अमृतकर यांनी २०१७ च्या महापालिका निवडणूक रिंगणातून पळ काढला होता. काँग्रेस पक्षाने शहराच्या प्रथम महापौरपदी विराजमान केल्यानंतरही त्यांनी निवडणूक लढली नाही. मागील साडेसात वर्षांपासून त्या पक्षाच्या कार्यक्रमाला हजर राहण्याऐवजी घरी बसून आहेत. अशा स्थितीत त्यांना निधी देणे योग्य होणार नाही, असे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच बैठकीतील तिवारी समर्थक एका कार्यकर्त्यांने नागरकर यांना पालकमंत्र्यांसमोर थेट मारहाणीची भाषा केली. नगरसेवकांच्या बैठकीत कार्यकर्त्यांला प्रवेश दिलाच कसा, असा आक्षेप नागरकर यांनी घेताच तिवारी व नागरकर यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी दोघांनी खुच्र्या सोडत एकमेकांना मारण्यासाठी दंड थोपटले. मात्र पालकमंत्र्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने तिवारी व नागरकर शांत झाले. त्यानंतर नागरकर समर्थक नगरसेवकांसह बैठकीतून निघून गेले तर तिवारी पालकमंत्र्यांसोबत बसून राहिले.

विशेष म्हणजे, २०१७ च्या निवडणुकीत नागरकर यांनी तिवारी यांचा पराभव केला होता. तिवारी यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी भाजपत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या ११ नगरसेवकांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अखेपर्यंत लावून धरली होती. तेव्हा पक्षाने या ११ नगरसेवकांना उमेदवारीच दिली नाही तर आता निधी कशाला हवा, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:01 am

Web Title: congress city president demand mineral development fund to guardian minister vijay wadettiwar zws 70
Next Stories
1 भारतीय चिकित्सा पद्धतींना आता केंद्राचे बळ
2 मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण केलेली हजारो झाडे बहरली
3 पुढचे पाच दिवस काळजीचे! पुण्यासह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुंबईला ऑरेंज अलर्ट
Just Now!
X