काँग्रेसच्या धोरणामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. जोपर्यंत देशात काँग्रेसचे धोरण आहे, तोपर्यंत भ्रष्टाचार कायम राहील, असे प्रतिपादन भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. भाजपच्या उद्योग आघाडीच्या वतीने शनिवारी येथे आयोजित उद्योग संमेलनात ते बोलत होते.
नवीन नाशिकमधील माउली लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमास खा. हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेविका सीमा हिरे, सुरेश अण्णा पाटील आदी उपस्थित होते. या वेळी भाजप उद्योग आघाडीचे संकेतस्थळ तसेच ‘अ‍ॅण्डरॉइड अ‍ॅप’चे अनावरण गडकरी यांच्या हस्ते झाले. गोदा उद्यान भूमिपूजन आणि या कार्यक्रमाची वेळ एकसारखीच होती. गडकरी यांनी प्रथम गोदा उद्यानाच्या कार्यक्रमास हजेरी लावली आणि नंतर ते या ठिकाणी दाखल झाले. यामुळे तब्बल चार तास कार्यकर्त्यांना तिष्ठत बसावे लागले.
जोपर्यंत जातीयवाद, सांप्रदायिकतेचे राजकारण थांबणार नाही, तोपर्यंत देशातील बेरोजगारी, गरिबी, भूकबळीसारखे प्रश्न सुटणार नसल्याचे गडकरी यांनी सांगितले. जातीयवादी राजकारणामुळे विकासाचे राजकारण मागे पडत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जी प्रगती अपेक्षित होती, ती अद्याप झालेली नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत असून गरीब हा गरीबच राहिला आहे. काँग्रेस शासनाने केलेले सर्व सार्वजनिक उपक्रम अपयशी ठरल्याची तक्रारही त्यांनी केली. देशातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या असे सर्व प्रश्न सोडविता येतील. पण ते सोडविण्याची इच्छाशक्ती असायला हवी. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आज मागे पडला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राखेचा वापर सिमेंटसाठी करता येईल. त्यामुळे नागरिकांना कमी दराने वीज उपलब्ध होऊ शकते. देशात आज जवळपास ३४ वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. करप्रक्रिया सुलभ करून त्यांचा भार कमी करता येईल. चांगले प्रशासन व ई-प्रशासनाद्वारे भ्रष्टाचारही कमी करता येईल, असे मुद्दे त्यांनी मांडले.