पालघर पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील दारुण पराभवाला काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले आहे. प्रचारादररम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेसने याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले तर काँग्रसचे दामोदर शिंगडा याचा पराभव होऊन त्यांची अमानत रक्कमही जप्त झाली. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मोठय़ा प्रमाणात सत्ता आणि पैशांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान साम, दाम, दंड भेदाची भाषा वापरली आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटून मुख्यमंत्र्यांची भाषा खरी करून दाखवली, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा दुप्पट खर्च केला आहे, असा आरोप त्यांनी केला. या सर्व गैरप्रकारांबाबत तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेसंदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली.

नवी दिल्ली येथे सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल केली. निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, असे चित्र दिसून आल्याचे या

तक्रारीत म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुनील अरोरा यांच्यापुढे तक्रार दाखल करत काँग्रेसने आपली बाजू मांडली.