सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेत एकीकडे पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ‘व्हिप’ बजावला असताना दुसरीकडे या सर्व नगरसेवकांना हैदराबादला हलविले आहे. येत्या शनिवारी हे सर्व नगरसेवक महापौरपदाच्या निवडणुकीवेळीच थेट महापालिकेत दाखल होतील.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असलेल्या महापालिकेत गेली सुमारे २५ वर्षे विष्णुपंत कोठे यांच्या गटाची सत्ता आहे. कोठे हे काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर अनुयायी समजले जात असले तरी अलीकडे उभयतांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. यातच कोठे यांचे पुत्र, माजी महापौर महेश कोठे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना धक्का देण्याच्या हेतूने शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोठे हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे राहण्याची तयारी करीत आहेत.
या पाश्र्वभूमीवर येत्या शनिवारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. पक्षाच्या सर्व ४३ नगरसेवकांना ‘व्हिप’ बजावण्यात आला आहे. त्यानंतरदेखील कोणीही नगरसेवक विरोधी पक्षाच्या संपर्कात जाऊ नये आणि पक्षाचा पराभव होऊ नये म्हणून सर्व नगरसेवकांना हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. महापौरपदाच्या उमेदवार प्रा. सुशीला आबुटे व स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक हैदराबादकडे रवाना झाले.
दरम्यान, महेश कोठे व त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे दोघे काँग्रेसचा पाडाव करण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला ऐनवेळी ‘रसद’ पुरविणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे. महापालिकेत कोठे गटाचे १५ नगरसेवक आहेत. मात्र पक्षशिस्त भंग अंगलट येऊन नगरसेवकपदासाठी अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर येऊ नये म्हणून कोठे गटाच्या नगरसेवकांनी तूर्त तरी पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. महापालिकेत एकूण १०२ नगरसेवकांपैकी सत्ताधारी काँग्रेसचे ४४, तर मित्रपक्ष राष्ट्रवादीचे १६ नगरसेवक आहेत. भाजपचे २५, शिवसेनेचे ९, माकपचे ३, बसपाचे ३, रिपाइं व अपक्ष-प्रत्येकी १ याप्रमाणे नगरसेवकांचे बलाबल आहे.