पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच पक्षाला रामराम केला. सध्या भाजपात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांचा काँग्रेस कार्यालयातील फोटो तसाच होता. अखेर दहा दिवसांनी कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो झाकला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला घसघशीत जनादेश मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाच्या दारात रीघच लावली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. यात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे.

पंधरा दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे जाहीर मेळावा घेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महाजनादेश यात्रेतही हर्षवर्धन पाटील हे सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राजकीय घडामोडी वेगात घडत असताना पुण्यातील काँग्रेस कार्यालयातील पोस्टरवर हर्षवर्धन पाटील यांचा फोटो पक्ष सोडल्यानंतरही झळकत होता. या पोस्टरचे फोटो प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी काढत असल्याचे लक्षात येताच, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या फोटोवर सुरुवातीला काळया पेनने फुल्या मारल्या. एवढ्यावर न थांबता पोस्टरवरील फोटो कागद लावून झाकून टाकला.