छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिनी असून, यानिमित्तानं त्यांना राजकीय नेते, समाजातील मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला असून, काँग्रेसनं यावर टीका केली आहे.

छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून महाराजांना अभिवादन केलं. “थोर सामाजिक कार्यकर्ते वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन,” असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. मात्र, फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या ट्विटवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखन आश्चर्यकारक नाही. संघानं मनुवाद आणायचा असल्यानं महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकस केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!,” असं ट्विट करत सावंत यांनी टीका केली आहे.

राजर्षि शाहू महाराजांविषयी केलेल्या ट्विटवरून नेटकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्या ट्विटबद्दल माफी मागावी, अशी मागणीही केली.