गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षाचे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. चीन सीमेवरील घडोमोडींवरून काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. तर भाजपाकडून प्रत्युत्तरात काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज (२८ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यात पंतप्रधानांनी चीनविरुद्ध एकही शब्द का काढला नाही म्हणून काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी ‘मन की बात’ केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’वरून महाराष्ट्र काँग्रेसनं एक ट्विट केलं आहे. ज्यात मोदींनी चीनचा उल्लेख का केला नाही, अशी विचारणा करत त्याचा खुलासाही केला आहे.

“पंतप्रधानांनी त्यांच्या नीरस मन की बात कार्यक्रमात चीनविरुद्ध एकही शब्द का काढला नाही? कारण चिनी कंपन्यांनी पीएम केअर फंडाला मोठी रक्कम दिली आहे. झिओमी १० कोटी, हुआवे ७ कोटी, वन प्लस १ कोटी, ओप्पो १ कोटी, टिकटॉक ३० कोटी,” असं म्हणत कांग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मन की बातमध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

“आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल, तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिलं आहे. जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहिदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात म्हटलं होतं.