सांगलीतील १३ आजी-माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुंबईतील निवासस्थानी या नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सांगलीचे खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे सुरेश आवटी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, विवेक कांबळे (माजी महापौर), माजी नगरसेवक आनंदा देवमाने, डॉ. महादेव कुरणे, जनता दलाचे विठ्ठल खोत, मनसेचे दिगंबर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांच्यासह इतर चार जणांनी मंगळवारी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला.

भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये ७ विद्यमान नगरसेवक तर २ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यांपैकी काँग्रेसच्या ४ नगरसेवकांचा समावेश असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्याक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने राष्ट्रवादीतील नगरसेवकांची गळती थांबल्याचे बोलले जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशचा विषय चर्चेत होता.

सांगलीत होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या नगरसेवकांचा भाजपा प्रवेश होणार होता. मात्र, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द झाली होती. त्यामुळे, थेट मुंबईत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.