दानवे तीन लाख ३२ हजार मताधिक्याने विजयी

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सलग पाचव्यांदा सहा लाख ९८ हजार १९ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना तीन लाख ६५ हजार २०४ मते मिळाली. दानवे यांनी औताडे यांच्यावर तीन लाख ३२ हजार ८१५ एवढे मताधिक्य घेतले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना ७७ हजार १५८ मते पडली. गेल्या सलग सात निवडणुकांत या मतदारसंघात भाजपकडून काँग्रेसचा पराभव झाला आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि दानवे यांच्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली दिलजमाई भाजपच्या फायद्याची ठरली. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेस उमेदवारापुढील आव्हानात वाढ झाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांचा परिणाम दानवे यांच्या संदर्भात झाला नाही. वंचित आघाडीने ७७ हजार १५८ एवढी मते घेतली नसती तर दानवे यांचे मताधिक्य घटले असते, परंतु त्यांना विजयापासून रोखता मात्र आले नसते. १५ हजार ६३७ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबून कुणाही उमेदवारास मत दिले नाही. ९५७ मते रद्दबातल ठरविण्यात आली.

या मतदारसंघात १९९६ पासून झालेला सातही निवडणुकांत काँग्रेसच्या वाटय़ाला पराभव आलेला आहे. १९९६ मध्ये ३३.२५ टक्के, १९९८ मध्ये ४६.५४ टक्के, १९९९ मध्ये २६.३० टक्के, २००५ मध्ये ४०.७६ टक्के, २००९ मध्ये ४२.९६ टक्के, २०१४ मध्ये ३६.०७ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास एकूण मतदारांपैकी ३१ टक्के मते मिळाली. या वेळेस काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे निवडून येण्याची शक्यता गृहीत धरली जात नव्हती. कारण दानवेंच्या तुलनेत त्यांना प्रचाराचा कालावधी कमी मिळाला होता आणि भाजपच्या तुलनेत त्यांच्या प्रचाराची गतीही कमी दिसत होती. परंतु औताडे यांना पैठणसह अन्य विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही आणि सहाही विधानसभा मतदारसंघांत दानवे यांचे मताधिक्य मोठय़ा प्रमाणावर राहिले.

सिल्लोडमध्ये सर्वाधिक ‘नोटा’

सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सिल्लोडमध्ये ‘नोटा’चा वापर सर्वाधिक झाला. एकूण १५ हजार ६३७ ‘नोटा’चे बटन दाबणाऱ्या मतदारांपैकी १२ हजार ३९६ मतदार सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील आहे. दानवे यांच्या पथ्यावर पडणारे ‘नोटा’ सिल्लोडमध्ये झाल्याची चर्चा मतदानानंतर राजकीय वर्तुळात होती. एकूण चार हजार ३१८ टपाली मतदानात दानवे यांना तीन हजार ७४, तर औताडे यांना ८५६ मते मिळाली.