काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मला सहा महिन्यांत राज्याचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देण्यात आला होता; पण आता नऊ वर्षे होत आली तरी शब्द पाळला गेला नाही म्हणून येत्या सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा भावना व्यक्त करण्याचा प्रकार असून, बंड नव्हे, असे काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्धव ठाकरे यांनी गप्प बसावे, अन्यथा वस्त्रहरण करणार आहे, तसेच आमदार दीपक केसरकर याने यापुढेही टीका सुरूच ठेवली तर त्याला पळता भुई थोडी करीन, असा इशाराही राणे यांनी दिला.
सावंतवाडीत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुका अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा सरचिटणीस संजू परब, दत्ता सावंत, संजय पडते उपस्थित होते.
राणे हे काँग्रेसचे वादळ आहे. कोकणातून वादळ सुरू झाले आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे. येत्या सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार म्हटल्यावर राज्यात वादळ निर्माण झाले आहे, असे राणे यांनी सांगून काही राजकीय पक्षाचे पुढारी तोंडसुख घेत आहेत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना चोख उत्तर दिल्याने त्यांचा आवाज बंद झाला आहे. भविष्यात त्यांनी काही केले तर वस्त्रहरण करणार आहे, असे राणे म्हणाले.
गेली दोन वर्षे गप्प होतो. त्याचा फायदा घेऊन समाजात अस्तित्व नसणारे पहिल्याच वेळी आमदार म्हणून निवडून आलेले तोंडसुख घेत आहेत. त्यात आमदार दीपक केसरकर आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत सावंतवाडी मतदारसंघात कोणता विकास साधला, असा प्रश्न करीत विकासात व्यत्यय आणणे एवढेच ध्येय ठेवून ते काम करताहेत. त्यामुळे दीपक केसरकर यापुढे बोलला तर मी ज्या पातळीवर बोलेन ते सहन करावे लागेल, असा इशारा दीपक केसरकर यांना त्यांनी दिला.
आमदार दीपक केसरकर याने दहशतवादाची टीका केली. कायम गोव्यात राहणाऱ्याला काय कळणार, असा टोला हाणत उद्धव भयमुक्त कोकण करणार म्हणतोय त्याने दीपकच्या करंगळी बोटीला पकडून प्रथम कोकण पाहावा. जनतेला माझ्याबद्दल किंवा काँग्रेसकडून कोणतीही भीती नाही, असे राणे म्हणाले. विधिमंडळात बोलण्याचे आणि मतदारसंघात फिरण्याचे टाळणारा दीपक केसरकर निव्वळ राजकारण करतोय, असे राणे म्हणाले.
सावंतवाडी, कणकवली व कुडाळ हे तिन्ही मतदारसंघ माझ्यासाठी खुले आहेत. केसरकर म्हणतो म्हणून मी सावंतवाडीत उभा राहू काय? त्याला एका पैशाचीही किंमत देत नाही, असे राणे म्हणाले.
पवारसाहेबांना सांगून दीपक केसरकरला उमेदवारी दिली, पण तो कृतघ्न झाला. पण दोष त्याला देणार नाही. त्याच्या घराण्याचे कल्चरच तसेच असेल त्यामुळे वेळप्रसंगी भांडाफोड करू, असा इशारा राणे यांनी दिला.
रवींद्र फाटक हवामान चांगले असल्याने गेला. त्याच्याबाबत काय बोलणार, असे राणे म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रचारप्रमुख अशी सर्व पदे यापूर्वीच चालून आली होती. राणे छोटय़ा पदासाठी भुकेलेला नाही. मी अपेक्षा मोठय़ा पदाचीच करतो. मला काँग्रेसने सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो, असा शब्द दिला होता, असे राणे म्हणाले.
खासदार विनायक राऊत आवाहन काय देणार, त्याला साधे बोलताही येत नाही.माझ्यासोबत असणारे कायमच उजेडात असतात, असे त्यांनी सांगून नीतेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांना शोधून काढू, असे त्यांनी सांगितले. मोदीलाट आता दूर झाली आहे. ती पुन्हा येणार नाही, असे मी सांगतोय. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे राणे यांनी स्पष्टीकरण दिले.