रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं आणि संताप व्यक्त केला. पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलं असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे.

साठेबाजीप्रकरणी औषध कंपनीच्या संचालकाची चौकशी

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, “खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे”.

१२ एप्रिलला भाजपा नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले होते.

“मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिली अन् त्यानंतर….,” फडणवीसांचा गंभीर आरोप

रविवारी नेमकं काय झालं –
दमण येथील ब्रूक फार्मा या औषध उत्पादक कंपनीकडे ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकनिया यांना त्यांच्या कांदिवलीतील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. हा साठा परदेशात निर्यात केला जाणार होता. मात्र भारत सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याने तो पडून होता. सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुडवडा आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमी वर रेमडेसिविरच्या ६० हजार इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डोकनिया यांची चौकशी सुरू केली होती. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकही चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात हजर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डोकनिया यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल झाले. डोकनिया यांना पोलीस बीकेसी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती मिळताच फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड आणि कार्यकर्त्यांसह बीकेसी पोलीस ठाण्यात गेले.

भाजप नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री डोकनिया यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. परंतु डोकनिया यांना गरजेनुसार पोलीस बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. डोकनिया यांनी रेमडेसिविरचा साठा का केला होता, याची चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई : फडणवीस
पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकांना घरातून ताब्यात घेतल्याचे समजल्यानेच आम्ही पोलिसांकडे गेलो. या निर्यातदारांशी भाजपनेत्यांनी दमणमध्ये संपर्क साधून निर्यात बंदीमुळे शिल्लक साठा महाराष्ट्रासाठी देण्याची विनंती केली होती व त्यांनी संमतीही दिली होती. त्यासाठी आवश्यक केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कायदेशीर परवानग्या मिळविल्या. त्यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांशीही बोललो होतो. तरीही घरी १०-११ पोलीस पाठवून या व्यावसायिकास का बोलाविण्यात आले, असा सवाल करीत एका मंत्र्याच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने या व्यावसायिकाला दुपारी दूरध्वनी करून धमकी दिली व ते ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी रात्री ही कारवाई केली. राजकीय हेतूंनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांना एवढा पुळका का : नवाब मलिक</strong>
ब्रुक फार्माच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलाविल्यानंतर भाजप नेते का घाबरले, भाजप नेत्यांनी या व्यावसायिकाचे वकीलपत्र घेतले आहे का, त्यांना सोडवायला विरोधी पक्षनेते व भाजप आमदार स्वत: का गेले, दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकत होती. त्यामुळे भाजपने याचा खुलासा करावा, अशी मागणी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी के ली. फडणवीस यांना या कं पनीचा एवढा पुळका का आला, असा सवालही त्यांनी के ला. रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विकण्याची परवानगी द्या, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करीत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भेटले होते. निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा आहे, त्या आधारे डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती. राजेश डोकानीया यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे. तुम्ही ट्वीट करुन ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आम्ही वाटणार आहे, असे सांगता. पण सरकार मागते, तेव्हा हे व्यावसायिक देत नाहीत. मग यामागे काय राजकारण आहे? हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले आहे.