माझं नक्षलवादासोबत नाव जोडलं गेलं. त्यावर अनेक वेळा चर्चादेखील झाली. हे पाहता मी दहशतवादी असेन तर मला अटक का केली जात नाही ? असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शहरी नक्षलवादात तुमचे नाव पोलीस तपासात पुढे आले होते असं विचारलं असता त्यांनी भूमिका मांडली.

२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देणार, देश भ्रष्टाचारमुक्त करणार, शेतकर्‍यांच्या मालास हमीभाव देणार यासह अनेक आश्वासने देण्यात आली. त्यामधील एकही आश्वासन पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न सोडवले तर नाहीच, केवळ आपल्याला स्वप्न दाखविण्याचे काम केलं असल्याचं सांगत दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

तसंच ते पुढे म्हणाले की, ‘भाजपाने २०१४ साली २८० च्या पुढे जाणार म्हटलं आणि त्याप्रमाणे झाले. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३०० च्या पुढे आमच्या जागा येणार असे भाजपाच्या नेत्याकडून सांगण्यात आलं. त्यानुसार ३०३० जागादेखील आल्या. या दोन्ही निवडणुकीतील आकडे अंत्यत खरे ठरले आहेत. हे पाहून आश्चर्य वाटत आहे’.

कर्नाटक येथील काँग्रेस पक्षाचे आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मागील पाच वर्षात भाजपने भ्रष्टाचाराच्या माध्यमातुन खूप पैसा मिळवला आहे. अशा पैशातून आणि चुकीच्या मार्गाने आमदारांना भाजपामध्ये घेतलं जात आहे’. या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच आम्ही सत्तेमध्ये असताना आमच्याकडून अशा प्रकारचे कृत्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय कमिटीने अध्यक्षपदाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा : दिग्विजय सिंह
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्याने अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारत कमिटीकडे राजीनामा सादर केला. त्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेण्याबाबत चर्चा केली. पण राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहे. आता हे पाहता राष्ट्रीय कमिटीने अध्यक्षपदाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली.