पक्षाने उमेदवारी देताना मुस्लिम, दलितांना डावललं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केला आहे. काँग्रेसच्या धोरणामुळे एमआयएमकडे ओढा वाढत आहे. एमआयएमला रोखण्यासाठी जी पावलं उचलली पाहिजेत ती उचलण्यात आली नाहीत असंही अनिस अमहद यांनी म्हटलं आहे. मुस्लिमांना गृहित धरण्याची चूक करु नका असा इशाराही यावेळी अनिस अहमद यांनी पक्षाला दिला आहे.

अनिस अमहद यांनी म्हटलं आहे की, ‘सर्व समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे. विदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र एकतर्फी विचार केला आहे. दलित, आदिवासी समाजाला न्याल दिलेला नाही. एमआयएम महाराष्ट्रात वाढत आहे. त्यांना रोखण्यासाठी जी पावलं उचलली पाहिजेत ती उचलली गेली नाहीत. एमआयएम वाढली आहे. म्हणूनच औरंगाबादमध्ये ते निवडून आले’.

आपल्या घरातील मतं आहेत असा विचार करणं चुकीचं आहे असं सागत मुस्लिमांना गृहित धरण्याची चूक करु नका असंही अनिस अहमद यांनी सांगितलं आहे. दलित समाजाच्या खऱ्या नेत्यांनाही बाजलून ठेवलं जात आहे असं अनिस अहमद यांनी सांगितलं. ज्यांनी काम केलं आहे त्यांना तसंच वरिष्ठ नेते यांना डावलून जर इतरांना तिकीट दिलं जात असेल तर याचा विचार झाला पाहिजे असं अनिस अहमद यांनी सांगितलं आहे.

पक्षाला मजबूत करायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. जनतेला न्याय मिळालेला नाही आणि पक्षाने यासंबंधी विचार केला पाहिजे असं अनिस अहमद यांनी सांगितलं.