प्रशांत देशमुख

१९३६ मधील यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सेवाग्राम अधिवेशनापाठोपाठ झालेल्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त करण्याच्या १९३६ च्या इतिहासाची यंदाच्या तीन राज्यांच्या निवडणूक निकालातही चमकदार पुनरावृत्ती झाली आहे.

२ ऑक्टोबर २०१८ रोजी सेवाग्राम येथे झालेल्या अधिवेशनातून नवा स्वातंत्र्यलढा लढण्याची तुतारी काँग्रेसतर्फे  फुंकण्यात आली होती. आगामी काळातील पाच राज्यांच्या व २०१९ची लोकसभा निवडणूक गांधी विचारधारा विरुद्ध गोडसे विचारधारा याच धर्तीवर लढण्याचा ठराव या अधिवेशनात संमत करण्यात आला होता. ही रणनीती यशस्वी ठरल्याचे नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालावरून दिसून येते.

सेवाग्रामच्या अधिवेशनाने १९३६ साली असाचा इतिहास घडवला होता. ब्रिटिश सरकारने प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घोषित केल्या होत्या. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा जवाहरलाल नेहरूंनी तयार केला. त्याला अंतिम स्वरूप सेवाग्राम कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आले. सर्वाधिक प्रांतात काँग्रेस पक्ष बहुमताने निवडून आला. काही प्रांतात मात्र कोंडी निर्माण झाल्यानंतर गांधीजींनी सेवाग्रामात चर्चा केली. तत्कालीन व्हॉइसरायकडून मिळालेल्या आश्वासनानंतर काँग्रेसने सत्ता स्वीकारली.त्यानंतर गांधीजींच्या आग्रहास्तव मद्यबंदी धोरण लागू झाले. याच धर्तीवर वर्तमानातही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शांततेचा, सद्भावनेचा गांधीविचार विरुद्ध हिंसेचा, दुहीचा गोडसे विचार असा पर्याय जनतेपुढे ठेवण्याचे धोरण मांडले.

गांधीजींच्या दीडशेव्या जयंती पर्वावर झालेल्या या कार्यकारिणी सभेने पुढील निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरल्याने सेवाग्रामातून मिळणारी ऊर्जा काँग्रेससाठी फलदायी ठरत असल्याचा पुनप्र्रत्यय आला आहे.

याबाबत अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव व कार्यकारिणी सभेचे एक आयोजक आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अधिवेशनातून ‘गांधी विरुद्ध गोडसे’ ही भूमिका घेऊन लढण्याचे ठरले होते. लोकांनी ही भावना उचलून धरत काँग्रेसला यश दिले आहे. सेवाग्रामातून मिळालेल्या ऊर्जेचे हे फलित आहे.