News Flash

नेतृत्वाअभावी रायगडमध्ये काँग्रेसची वाट बिकट

गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही.

हर्षद कशाळकर, अलिबाग

बॅ. ए. आर. अंतुले यांच्यासह प्रमुख नेत्यांनी नेतृत्व केलेल्या रायगडमधील काँग्रेस पक्ष संघटनेला गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर गळती लागली. पक्षाला एकसंध बांधून ठेवेल असा एकही नेता काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेला नाही. पक्षाची वाताहत लक्षात घेऊन जुन्या नेत्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारल्याने अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला तारणार कोण, हाच प्रश्न आहे.

रायगड जिल्ह्य़ात एके काळी काँग्रेस आणि शेकाप हे दोनच प्रमुख पक्ष होते. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्य़ातील काँग्रेसला उतरती कळा लागली. राष्ट्रवादीने काँग्रेसचे खच्चीकरण सुरू केले, तर अंतुले यांच्या निधनानंतर पक्षाला ग्रहणच लागले. पक्षाला एकसंध ठेवेल असे नेतृत्वच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पक्षाची होणारी वाताहत रोखायची कशी, हा मोठा प्रश्न आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला उतरती कळा लागली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पनवेल काँग्रेस पक्ष एका झटक्यात नेस्तनाबूत झाला. याचे दूरगामी परिणाम जिल्ह्य़ातील इतर भागांतही पाहायला मिळाले.  विधानसभा आणि नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. पेण आणि महाड नगरपालिका आणि दोन जिल्हा परिषद सदस्य सोडले तर पक्षाचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. ही परिस्थिती बदलावी यासाठी गेल्या पाच वर्षांत फारसे प्रयत्न झाले नाहीत.

माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघात पक्षाची कोंडी झाली आहे. पेणमध्ये प्रतिनिधित्व करू शकेल असे नेतृत्वच नाही. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. माजी आमदार मधुकर ठाकूर सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यांच्या कुटुंबात वर्चस्ववाद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवाराच्या चाचणी प्रक्रियेदरम्यान याचा प्रत्यय आला आहे. ठाकूर कुटुंबातील तिघांनी पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या आहेत. मात्र या तिघांकडेही मधुकर ठाकूर यांच्यासारखा जनाधार नाही. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून वेळोवेळी समोर आले आहे.

श्रीवर्धन मतदारसंघ हा पूर्वी अंतुलेंचा बालेकिल्ला  म्हणून मानला जायचा. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ नंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आला. मतदारसंघ ताब्यात आल्यावर राष्ट्रवादीने काँग्रेसने येथील काँग्रेस संघटना पोखरून काढली. पक्षाच्या ढासळणाऱ्या परिस्थितीकडे मुश्ताक अंतुले यांनी फारसे लक्षच दिले नाही, तर नावेद अंतुले यांनी थेट शिवबंधन हातात बांधले. महाड मतदारसंघात माणिक जगताप यांनी पक्षाचे अस्तित्व कायम राखण्याचा प्रयत्न केला. उरण आणि कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातही पक्षाची विरोधकांनी दखल घ्यावी अशी परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही.

शेकापशी आघाडी अडचणीची?

शेकाप हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधक. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघांत दोन्ही पक्षांत नेहमी टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. यात शेकाप अनेकदा वरचढ ठरतो. याचे शल्य काँग्रेसमधील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नेहमीच असते. दोन्ही पक्षांतील वाद कधी कधी टोकाला जातात आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडतात. आता काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाकडून शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. पक्षाची वाताहत होण्यामागचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 2:24 am

Web Title: congress face big challenge in raigad due to lack of leadership zws 70
Next Stories
1 सांगलीत महापुरामध्ये २६ जणांचा मृत्यू
2 ९३ वर्षीय वडिलांचा सांभाळ करण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये देण्याचे आदेश
3 ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात नागरी समस्यांविरोधात आवाज
Just Now!
X