नंदुरबार, तळोदा आणि नवापूर या तीन पालिकांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, जिल्ह्य़ातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये आधीच शहादा पालिकेची सत्ता काबीज करत भाजपाने आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. तिन्ही पालिकांवरील सत्ता कायम कायम ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच त्यास लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ातही नगरपालीका निवडणूक होत आहे. नंदुरबारमध्ये भाजपने एक खासदार आणि दोन आमदार निवडून आणत हादरे दिले. मात्र जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थावर अद्याप भाजपला पक्कड मजबूत करता आलेली नाही. यामुळे तीन नगरपालिकांच्या निमित्ताने भाजपने कंबर कसली आहे. मागील वर्षी भाजपने शहादा पालिका काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावत भाजपचा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया केली होती.

सर्वाचे लक्ष आहे ते नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीकडे. मागील निवडणुकीत ३७ पैकी ३६ नगरसेवक निवडून आणण्याची किमया काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी करून दाखवली होती. रघुवंशी यांच्या पत्नीच काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्याने त्यांना शह देण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.  अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे उद्योगपती असलेले बंधू रवींद्र चौधरी यांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे. भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित आणि नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

नवापूर नगरपालिकेवरदेखील काँग्रेसची सत्ता असून काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार सुरूपसिंग नाईक आणि माजी खासदार माणिकराव गावित या जोडीचे या शहरावर कायमच प्रभुत्व राहिले आहे. वयोमानामुळे दोन्ही नेत्यांनी आपल्या चिरंजीवांना राजकारणात सक्रिय केले आहे. शिरीष नाईक आणि भरत गावित यांच्यातील अंतर्गत मतभेदाबाबत होणाऱ्या चर्चेमुळे काँग्रेसला या ठिकाणी मेहनत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यातच मित्र पक्ष असलेली राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आपली ताकद जोखत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित आपल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मानून मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला नवापूरमधून सर्वात कमी मते पडल्याने खा. डॉ. हिना गावित नवापूर पालिकेवर लक्ष ठेवून आहेत.

तळोदा पालिकेवर काँग्रेसचे नेते भरत माळी यांचे प्रभुत्व असले तरी याच मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांनी काँग्रेसचा हा गड काबीज करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी भरत माळी हे रिंगणात असल्याने त्यांना शह देण्यासाठी भाजपने अजय परदेशी यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे. नगराध्यपदाचे तिकीट देताना भाजपचे ज्येष्ठ प्रदेश कार्यकारणीचे सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूरही उमटत आहे. अनेक वर्षे सत्तेत नसताना ऐन मोक्याच्या वेळी निष्ठावंतांना डावलले जात असल्याने भाजपमधील नाराजांचा गट पक्षाची डोकेदुखी ठरली आहे. काँग्रेसचे माजीमंत्री पद्माकर वळवी यांनी या निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन तळोद्यात तळ ठोकला आहे. या तीनही नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून, राज्याच्या स्थापनेपासून राज्यातील नंदुरबार आणि सांगली हे दोनच लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम होते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला होता. जिल्ह्य़ात माणिकराव गावित आणि डॉ. विजयकुमार गावित यांच्यात कमालीचे वितुष्ट आहे.

काँग्रेसचा मोर्चा असल्याने त्यात सहभागी होऊ, पण अजूनही मनात अनेक प्रश्न आहेत. विदर्भ ही काँग्रेसची भूमी आहे, ग्रामीण भागापर्यंत पक्षाचे पाळेमुळे गेली आहेत.  दुसरीकडे राष्ट्रवादी विदर्भात कुठेही नाही. अशा परिस्थितीत मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते पवार यांना देणे बुचकाळ्यात टाकणारे आहे. अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली २०१५ मध्ये निघालेला मोर्चात एक लाखावर नागरिक सहभागी झाले होते. मात्र, गेल्यावर्षी मोर्चा का काढला नाही, सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत आम्ही चर्चा केली, पण त्यात मोर्चा हा विषय चर्चेला गेला नव्हता.

– नितीन राऊत, माजी मंत्री