News Flash

भाजप-शिवसेनेत कुरबुरी, तर काँग्रेसपुढे जागा राखण्याचे आव्हान

पंचायत समिती व जिल्हा परिषद काँग्रेसकडून हिसकावून घेणाऱ्या भाजपचा आता खासदारही पुन्हा निवडून आला.

(संग्रहित छायाचित्र)

वेध विधानसभेचा वर्धा

प्रशांत देशमुख, वर्धा

आगामी विधानसभा निवडणुकीत युती अभेद्य राखण्याच्या गर्जना झाल्याने विद्यमान आमदारांच्या जागांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र एकीकडे तर तिकिटाची हमखास खात्री असलेले काँग्रेसचे आमदार निर्धास्त असल्याचे चित्र दुसरीकडे दिसत आहे.

गेल्या पाच वर्षांत जिल्हय़ातील सर्व नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद काँग्रेसकडून हिसकावून घेणाऱ्या भाजपचा आता खासदारही पुन्हा निवडून आला. जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याच्या निर्धारात आता विधानसभेचे देवळी व आर्वी हे दोनच मतदारसंघ अडसर ठरले आहेत. अशी भावना ठेवणाऱ्या भाजपपुढे शिवसेनेसोबत युती करताना या वेळी वेगळाच पेच उभा झाला आहे. युतीत पारंपरिक हिस्सेवाटणीत वर्धा व हिंगणघाट ही दोन क्षेत्रे सेनेकडे असायची. युती फुटल्यावर या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले. तर भाजपच्या वाटय़ाला येणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. कळीचा मुद्दा हिंगणघाटचा आहे. विदर्भातील सेनेचे एकमेव उपनेते व माजी मंत्री असलेले अशोक शिंदे यांनी तीन वेळा इथून बाजी मारली. गतवेळी भाजपकडून ते पराभूत झाले असले तरी या मतदारसंघावरील त्यांचा दावा कायम आहे. सेनेचे पूर्व विदर्भातील नाक म्हणून हिंगणघाटकडे पाहिले जाते. एकवेळची युती तुटली तरी चालेल, पण सेना हिंगणघाट सोडणार नाही, असे सेनानेते सांगतात. भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्यावर जिल्हय़ातील ज्येष्ठ नेत्यांची असलेली नाराजी तसेच हजारो शेतकऱ्यांची वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने असलेली नाराजी त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता मांडली जाते.

वर्धा मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना पक्षांतर्गत स्पर्धा नाही. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना असलेला आशीर्वाद लपून राहिलेला नाही. असा आशीर्वाद व गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासाच्या भरीव कामांमुळे त्यांच्यासाठी वर्धा मतदारसंघ राखून ठेवण्याची भूमिका चर्चेत आहे. पक्षाच्या जाहीर व्यासपीठावर खासदार रामदास तडस यांनी भोयर यांच्या विजयाची पुन्हा खात्री देत सेनेला एकप्रकारे इशाराच दिल्याचे म्हटले जाते. आर्वीत भाजपतर्फे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास समजल्या जाणारे सुधीर दिवे यांचे नाव पुढे येत आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मतदारसंघ प्रमुख म्हणून त्यांच्याकडेच धुरा होती. माजी आमदार दादाराव केचे यांच्याविषयी असलेली नाराजी चर्चेत आल्यानंतर दिवेंचे नाव गेल्या तीन वर्षांपासून पक्षाकडून आघाडीवर आले. देवळीसाठी दावा करणाऱ्या सेनेतर्फे  अनंत देशमुख यांच्यासाठी मतदारसंघ मागण्याचा सेना नेत्यांचा प्रयत्न आहे, तर भाजपनेही काँग्रेसचे रणजीत कांबळे यांच्या पराभवाचा विडा उचलल्याने मतदारसंघावर दावा केला आहे. युती करताना ५०-५० टक्के वाटपाचा फॉम्र्युला मान्य झाला तर कोणावर कुऱ्हाड कोसळणार, याचीच चर्चा भाजप वर्तुळात होत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आर्वी व देवळी-पुलगाव मतदारसंघात काँग्रेसचेच आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा व हिंगणघाट मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यापूर्वी केवळ हिंगणघाट मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र पक्षाचे जिल्हय़ातील सर्वेसर्वा प्रा. सुरेश देशमुख यांच्यासाठी वर्धा मतदारसंघाचा आग्रह धरला जात आहे, तर काँग्रेसचे गेल्या दोन वेळा पराभूत शेखर शेंडे परत लढण्यास इच्छुक असल्याने वर्धा मतदारसंघाचे त्रांगडे जागावाटपात उद्भवू शकते. हिंगणघाटला मात्र राजू तिमांडे किंवा सुधीर कोठारी यापैकी एक नाव निश्चित होईल. भाजप व काँग्रेस नेतृत्वास जातीय ध्रुवीकरणाचे भान ठेवून वाटचाल करण्याचे आव्हान आहे. कुणबी-तेली वाद तिकीटवाटपात नेहमीच घोंगावतो. चारच मतदारसंघ असल्याने प्रमुख चार पक्षांना जातीय आधारावरील तिकीटवाटप आजपर्यंत आव्हानात्मक ठरले आहे, पण असे असूनही या दोन प्रमुख जातीखेरीज छोटय़ा समाजघटकातील नेत्यांनी मोठय़ा पक्षात प्रभुत्व निर्माण केल्याने त्यांच्याही उमेदवारीचा विचार करणे पक्षनेत्यांना क्रमप्राप्त ठरले आहे. दुष्काळाचे भयावह सावट असल्याने ग्रामीण भागात असलेल्या उदासीनतेमुळे इच्छुक उमेदवारही सध्या गप्पच आहे.

२०१४ चे राजकीय चित्र

आर्वी-          काँग्रेस

देवळी-         काँग्रेस

वर्धा-            भाजप

हिंगणघाट-    भाजप

 

पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्याने मलाच उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. तीन वेळा इथल्या जनतेने मला निवडून दिले. पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर नेहमीच भर दिला. युतीत हिंगणघाट मतदारसंघ सेनेकडेच राहण्याची खात्री दिली जाते.

– अशोक शिंदे, शिवसेना उपनेते

पक्षाने संधी दिल्यास आर्वीतून लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. प्रशासकीय, संघटनात्मक व विविध निवडणुकीच्या अनुभवाच्या आधारे माझ्या जन्मभूमीतून लढण्याची मी इच्छा व्यक्त केली. दिवे प्रतिष्ठानतर्फे  चालणाऱ्या अनेक उपक्रमांमुळे ग्रामीण भागाशी जोडला गेलो. माझे पक्षांतर्गत विरोधक असू शकतात. पण पक्ष जो निर्णय देईल तो मी मान्य करीन. मी पक्षाला सर्वोच्च महत्त्व देणारा आहे.      

– सुधीर दिवे, भाजप इच्छुक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 4:56 am

Web Title: congress face challenge to win seat in wardha constituency zws 70
Next Stories
1 प्रभावशाली विरोधी आमदारांसाठी भाजपचा गळ
2 सोलापुरातही राष्ट्रवादीच्या आमदारांची मुलाखतीकडे पाठ
3 मुलीच्या विनयभंगातील आरोपीला शिक्षेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा
Just Now!
X