पक्षासाठी फारसे अनुकूल वातावरण नसताना काँग्रेसने विदर्भात प्रस्थापित नेत्यांचे मतदारसंघ बदलण्याचा केलेला प्रयोग अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळू नये, यासाठीच हा प्रकार करण्यात आला, अशी चर्चा पक्ष वर्तुळात सुरू झाली असून हा प्रयोग अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा विदर्भात दारुण पराभव झाला. त्यामुळे विधानसभेची निवडणूक काँग्रेसकडून आणखी जबाबदारीने लढली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र भलतेच घडले. आघाडी तोडून स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेल्या काँग्रेसने यावेळी प्रथमच अनेक प्रस्थापित नेत्यांचे मतदारसंघ बदलले. जिंकण्याची स्थिती असेल तरीही आणि पराभव समोर दिसत असेल तरीही मतदारसंघ बदलून मिळणार नाही, अशीच भूमिका काँग्रेसने आजवर घेतली होती. यावेळी या भूमिकेला चक्क तिलांजली देण्यात आली. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पराभवाच्या भीतीने ब्रम्हपुरीतून उमेदवारी मागितली. या बदलाला ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी तीव्र विरोध केला. मात्र, अशोक चव्हाणांच्या आग्रहाला बळी पडत वडेट्टीवारांना मतदारसंघ बदलून देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्य़ात अहेरी मतदारसंघात सक्रीय असलेल्या सगुणा तलांडींना गडचिरोलीतून उमेदवारी देण्यात आली. माजीमंत्री व मुख्यमंत्र्यांचे कट्टरसमर्थक राजेंद्र मुळक गेल्या चार वर्षांंपासून पश्चिम नागपुरात सक्रीय नेते होते. त्यांना ऐनवेळी कामठीतून उमेदवारी देण्यात आली. गेल्या निवडणुकीत पूर्व नागपुरातून ३० हजाराच्या फरकाने पराभूत झालेले सतीश चतुर्वेदी यांना दक्षिण नागपुरातून उमेदवारी देण्यात आली. यासाठी विद्यमान आमदार दीनानाथ पडोळेंचा पत्ता कापण्यात आला. गेल्या वेळी दक्षिणमधून पराभूत झालेले शिक्षणसम्राट अभिजित वंजारी यांना पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी पश्चिममधून मोठय़ा फरकाने पराभूत झालेले अनीस अहमद यांना मध्यमधून रिंगणात उतरवण्यात आले.
गेल्या वेळी दक्षिण पश्चिममधून हरलेले विकास ठाकरे यांना पश्चिममधून उमेदवार करण्यात आले. गेल्या वेळी जनतेने सपशेल नाकारलेल्या या नेत्यांना केवळ मतदारसंघ बदलून पुन्हा रिंगणात ठेवण्याच्या काँग्रेसच्या या प्रयोगामध्ये नेमका तर्क तरी कोणता, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पराभूतांचे मतदारसंघ बदलल्याने त्यांच्या विजयाची शक्यता वाढते का, असाही प्रश्न आता कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. या साऱ्या फिरवाफिरवीच्या मागे नेमके कुणाचे डोके आहे, यावर आता पक्षात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा परंपरागत मतदारसंघ दिग्रस आहे. तेथून त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली असती तर ते एकदाचे समजून घेता आले असते. मात्र, त्यांनी राहुलला यवतमाळमधून अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवून दिली. त्यासाठी विद्यमान आमदार नंदिनी पारवेकरांचा पत्ता कापण्यात आला. पारवेकर दोन वर्षांपूर्वीच निवडून आल्या आहेत तेव्हा त्यांना डावलू नका, असे गुलाबनबी आझाद यांनी सांगितले, पण ठाकरेंच्या हट्टापुढे कुणाचेच काही चालले नाही. वरोऱ्यातून माजीमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी नाकारताना पुन्हा तोच घोळ पक्षाने केला. आसावरी देवतळे यांनी उमेदवारी मागितली नसताना सुद्धा त्यांना उमेदवार करण्यात आले. त्यामुळे विजय देवतळेंना हात चोळतबसावे लागले. यावेळचे वातावरण पक्षासाठी फारसे अनुकूल नाही. तरीही काँग्रेसने हा प्रयोग केला. नव्या चेहऱ्यांना संधी मिळू नये यासाठीच हा प्रकार करण्यात आला. ब्रम्हपुरीत रवींद्र दरेकर व युवक काँग्रेसचे अनेक तरुण कार्यकर्ते इच्छुक होते.
कामठीत सुरेश भोयर, तर मध्य नागपुरात जयप्रकाश गुप्ता इच्छुक होते. वातावरण पोषक नसल्याने नवा चेहरा दिला तर काही फरक पडेल हा तर्क पटण्यासारखा असूनही हा ‘शिफ्टींग’चा खेळ काँग्रेसने खेळला. प्रतिकूल स्थितीतही पक्षाचे नेते केवळ स्वत:चा विचार करतात, हेच यातून दिसून आले, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रवींद्र दरेकर यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. पराभूत झालो तरी मीच, अशीच भूमिका नेत्यांची असेल आणि पक्षश्रेष्ठी त्याला साथ देत असतील तर कार्यकर्त्यांनी दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न आता पक्षात उपस्थित होत आहे. हा प्रयोग अंगलट येण्याची शक्यता पक्षात बोलून दाखवली जात आहे.

भाजपमध्येही तेच
काँग्रेस पाठोपाठ भाजपमध्येही बदलाबदलीचा खेळ रंगला. आशीष देशमुख सावनेरसाठी इच्छुक होते. त्यांना ऐनवेळी काटोलमधून उमेदवारी देण्यात आली. समीर मेघे पश्चिम नागपुरातून लढायला तयार होते. त्यांना अखेरच्या क्षणी हिंगण्यात पाठवण्यात आले. हा सारा प्रकार मतदारांना गृहीत धरण्याचा नाही का, असा प्रश्नही आता भाजप वर्तुळात उपस्थित केला जात आहे.