जालना, सिल्लोड व फुलंब्री विधानसभा मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रीत करून तेथे जास्तीत जास्त मते मिळविणे आणि उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपची मागील तुलनेत अधिक पीछेहाट करण्याच्या दृष्टीने जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रयत्न चालविले आहेत.
जालना लोकसबा मतदारसंघात सलग पाच वेळा भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. यातील मागील सलग तीन विजय रावसाहेब दानवे यांनी मिळविले आहेत. आता चौथ्या वेळेस मतदारांचा कौल घेण्यास ते मैदानात उतरले आहेत. निवडणुका जिंकण्याचे कसब अंगी असणाऱ्या दानवे यांचा पराभव करणे ही वाटते तेवढी सहजसाध्य बाब नाही, याची पुरेपूर जाणीव काँग्रेसच्या जालना जिल्ह्य़ातील बहुतेक जुन्या नेत्यांना आहे.
सन २००९च्या आधी मतदारसंघाची पुनर्रचना होईपर्यंत पैठण विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभेत समाविष्ट होता. त्यावेळी १९९१ ते २००४ या दरम्यान झालेल्या सहाही लोकसभा निवडणुकांत पैठणमध्ये शिवसेनेला मताधिक्य मिळाले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीत पैठणचा समावेश जालना लोकसबा मतदारसंघात झाल्यावरही तेथे भाजपच्या दानवे यांना मताधिक्य मिळाले. या पाश्र्वभूमीवर या वेळेसही भाजपला पैठणमधून मताधिक्य मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु सध्या पैठणची आमदारकी राष्ट्रवादीकडे असून, त्या आधारे तेथे आता भाजपपेक्षा अधिक मते घेण्याची व्यूहरचना काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे करीत आहेत.
मागील निवडणुकीत सिल्लोड विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला भाजपपेक्षा १ हजार ८३८ मते अधिक मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास ९८ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे आता सिल्लोडमध्ये मोठे मताधिक्य कसे मिळेल, या दृष्टीने औताडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. २००९ पूर्वी औरंगाबाद लोकसभा व सध्या जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या फुलंब्री (औरंगाबाद पूर्व) विधानसभा क्षेत्रात २००४ पर्यंत सलग सहा वेळा शिवसेनेचे मताधिक्य राहिले आहे. गेल्या निवडणुकीत फुलंब्रीत दानवे यांना १३ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. या वेळी औताडे व दानवे यांच्यात या मतदारसंघात चांगलीच चुरस आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या प्रभावाचा हा भाग आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, तरी जालना विधानसभा मतदारसंघात त्या पक्षाला १५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे औताडे व दानवे या दोघांचेही या मतदारसंघात अधिक मते मिळविण्यास प्रयत्न सुरू आहेत.
भोकरदन विधानसभा क्षेत्रात मागील वेळी ४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेणाऱ्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार चंद्रकांत दानवे यांनी या वेळी आक्रमक प्रचार करून आव्हान उभे केले आहे. बदनापूर विधानसभेची जागा सध्या शिवसेनेकडे असून, तेथे मागील वेळी भाजपला ६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. येथे शिवसेनेच्या मदतीने दानवे यांनी प्रचाराची व्यूहरचना केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार औताडे हे स्वपक्षीयांसह राष्ट्रवादीच्या मदतीने प्रचार चालविला आहे.