विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची लढत भाजपबरोबर आहे. राष्ट्रवादीने आघाडी तोडली तेव्हाच त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. शिवसेनेची ताकद तेवढी नसल्याचे काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी सांगितले. औरंगाबाद मध्यचे उमेदवार एम. एम. शेख यांच्या प्रचाराला आयोजित कार्यकर्ता बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राणे म्हणाले की, भाजपकडे खोटे बोलण्याचे यंत्र आहे. रेटून खोटे बोलण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. भाजपचे फडणवीस तर महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे घडय़ाळ बंद पडले आहे. अजित पवार आता वेगवेगळे आरोप करत आहेत. पण एवढे दिवस आमच्याकडेच नांदले ना, आमच्याच नावाचे मंगळसूत्र बांधले ना, तेव्हा मांडीला मांडी लावून बसलात आणि आता का डराव, डराव करता, असेही राणे म्हणाले. गावावरून ओवाळून टाकलेली माणसे, गुंडगिरी करणारे राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे घडय़ाळाची हाताला मदत होत नाही. तर हातामुळेच घडय़ाळाला मदत करता येते, असेही ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हणाले.
 शिवसेनेने विकासाचे कोणते काम केले, असा सवालही त्यांनी केला. प्रदीप जैस्वाल यांच्यापेक्षा एम. एम. शेख अधिक सरस असल्याचा दावाही त्यांनी केला.