सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील यांचा २ लाख ३९ हजार मतांनी पराभव करून भारतीय जनता पक्षाचे संजयकाका पाटील यांनी विजय संपादन केला. सांगलीतील विजयाने भाजपने काँग्रेसला बालेकिल्ला उद्ध्वस्त करीत गेली ३२ वष्रे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याकडे असणारी खासदारकी पटकावली आहे.
सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय अनपेक्षित असला तरी काँग्रेस आघाडी अंतर्गत असणाऱ्या बेबनावाचा परिपाक मानला जात असला तरी ही निवडणूक राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा सामान्य मतदारांनीच हाती घेतल्याचे मतमोजणीवेळी स्पष्ट झाले. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला वर्चस्व सिद्ध करता आलेले नाही. सांगली, मिरज या शहरी मतदारसंघासह तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, खानापूर आणि जत सहा विधानसभा मतदारसंघांत सामान्य मतदारांनी भरभरून भाजपला मतदान केले.
या निवडणुकीच्या निमित्ताने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपली प्रतिष्ठा काँग्रेसच्या विजयासाठी पणाला लावली होती. प्रचाराच्या कालावधीत त्यांनी सांगलीतच तळ ठोकला होता. तरीसुद्धा त्यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात भाजपला २७ हजार ८२७ मतांचे मताधिक्य मिळाले.
काँग्रेस विरोधी असणारे जनमत नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे मतामध्ये परिवर्तन झाल्याने सांगलीमध्ये १९६२ नंतर प्रथमच काँग्रेसविरोधी उमेदवार विजयी झाला असून, मताधिक्याचा विक्रमही नोंदवला आहे. यापूर्वी १९७१मध्ये काँग्रेसचे अण्णासाहेब गोटिखडे यांनी २ लाख १८ हजार २५६ मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. या वेळी भाजपचे संजयकाका पाटील यांनी २ लाख ३९ हजार २९२ इतके मताधिक्य मिळवीत परिवर्तन घडविले आहे.
या निकालानंतर संजयकाका पाटील म्हणाले, की काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली गेलेली आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेली लोकसभा निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे जनताच वारस नसून सरस असल्याचे या निकालावरून दिसून येते. भविष्यात दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, औद्योगीकरणाला चालना आणि रस्त्यासारख्या मुलभूत सुविधा पुरविण्यावर आपला भर राहील.
तर प्रतीक पाटील म्हणाले, की जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेने नकारात्मक मतदान केल्याने विरोधकांचा विजय झाला असून, काँग्रेसचे चांगले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यात आम्ही उणे पडलो. या पुढील काळातही जनतेच्या प्रश्नासाठी जनतेबरोबर राहून कार्य करीत राहू.