केंद्र व राज्य शासनाच्या निष्क्रिय कार्याचा पर्दाफाश करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी अमित सनी यांना निवेदन देण्यात आले.
संसदेची पावसाळी अधिवेषण वादाग्रस्त स्थितीतच वाहून गेले. काँग्रेस पक्षाने ललित मोदी, व्यापम घोटाळा, वसुंधराराजे आदी मुद्यावरून सभागृह चालवू दिले नव्हते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या विरोधात भाजपाने देशभर आंदोलने केली. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाकडून देशव्यापी पर्दाफाश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
आंदोलनासाठी काँग्रेस कार्यकत्रे जिल्हा काँग्रेस भवनात जमले होते. येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हार चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. दंडाला काळ्या फिती बांधलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. ललित मोदीसाठी पुढाकार, अजब-गजब मोदी सरकार, ललित मोदीला संरक्षण देणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
गटबाजीचे दर्शन
जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटबाजी वाढतच चालली आहे. नुकत्याच झालेल्या सद्भावना दिन कार्यक्रमाकडे अनेक प्रमुखांनी पाठ फिरविली होती. आजही आमदार महादेवराव महाडिक माजी आमदार मालोजीराजे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे अशा अनेकांनी मोर्चापासून लांब राहणे पसंत केले. आंदोलनासाठी जिल्हा काँग्रेसकडून निरोप नसल्याचा दावा करण्यात आला.