मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने मागे घेणे, प्रशांत परिचारक यांना सभागृहात येण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीची मान्यता हे सारे मान्य झाल्यावर विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे सोपविण्याचा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा तोडगा काढण्यात आला.

उपसभापतिपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची घोषणा सोमवारी  केली जाणार आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने विधिमंडळात राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेसने गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली आणि विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जाणार नाही, असे सत्ताधाऱ्यांच्या वतीने विरोधकांकडे स्पष्ट करण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाशी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा संबंध जोडला गेल्याने शिवसेना आणि काँग्रेसची पंचाईत झाली.

विधान परिषदेचे उपसभापतिपद आघाडीत काँग्रेसला मिळणार होते. सत्ताधाऱ्यांचा विरोधकांपेक्षा एक सदस्य जास्त आहे. निवडणूक झाल्यास काँग्रेसला विजयाची खात्री नव्हती. काँग्रेसने उपसभापतिपदावरील दावा मागे घेतल्यास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देऊ, असे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले होते. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा केली. शेवटी विरोधी पक्षनेतेपदाच्या बदल्यात उपसभापतिपदावरील दावा मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. प्रशांत परिचारक यांना सभागृहात येण्यास परवानगी द्यावी म्हणून विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्यात बैठक झाली.

राष्ट्रवादीने परिचारक यांना असलेला विरोध मागे घेतला. उपसभापतिपद हवे असल्यास परिचारक यांना असलेला विरोध मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला केले.

उपसभापतिपदी नीलम गोऱ्हे?

आठवडाभरांच्या विविध बैठका आणि मध्यस्थीनंतर शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या भूमिकेत बदल केला. त्यानुसार विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे सोपविले जाणार आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदार नीलम गोऱ्हे यांची बहुधा उपसभापतिपद निवड केली जाण्याची शक्यता आहे. सोमवारी या पदासाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली जाईल.