“खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे.” अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन

खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, “राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काँग्रेस विचारांवार त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत मनमिळावून स्वभाव व कुशल संघटक असणा-या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.”

हे वृत्त धक्कादायक! महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार

तसेच, “पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायम तळागाळातील कष्टकरी शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांना त्यांनी राज्यसभेत अत्यंत आक्रमकपणे विरोध करून शेतक-यांची बाजू लावून धरली होती. गुजरातचे प्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुजरातमध्ये पक्षाची बांधणी करून काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी आपल्या कौशल्याने व कर्तृत्वाने त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. राष्ट्रीय राजकारणातही आपल्या कामाने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.” असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू नेमका काय?

“करोनावर मात करुन ते पुन्हा उभारी घेतील असे वाटत असतानाच आज(रविवार) सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून निशब्द झालो. त्यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी व वैयक्तीक आपल्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची व वैयक्तीक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. खा. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.”, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुःख व्यक्त केलं आहे.